'रेप इन इंडिया' विधानावर राहुल गांधी ठाम; भाजपच्या टीकेनंतर काय दिली प्रतिक्रिया?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

भाजप सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केल्यानंतर राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून आज, लोकसभेत गदारोळ उठला. राहुल गांधी यांनी या विधानावर महिलांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला सदस्यांनी केली. पण, या विषयावर मीडियाशी संवाद साधत राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला. भाजप या विधानचा राजकीय मुद्दा करत असल्याची टीका राहुल यांनी या वेळी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल गांधींची प्रतिक्रिया काय? 
भाजप सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केल्यानंतर राहुल यांनी मीडियाशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण जगात भारताची बदनामी झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि माझी भेट झाली. त्यात त्यांनी जगात भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा होत नसल्याचं सांगितलं. युरोप आणि अमेरिकेत केवळ भारतातील महिला अत्याचाराच्या घटनांची चर्चा होत असल्याचं राजन यांनी सांगितलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचं उत्तर द्यावं लागेल. देशाची अर्थव्यवस्था का ढासळली? तरुणांच्या हातातील रोजगार का काढून घेतला. या सगळ्याची उत्तरं नरेंद्र मोदी यांना द्यावी लागतील. मी त्या विधानावरून माफी मागणार नाही.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसा पसरवतात. संपूर्ण देशात हिंसाचार सुरू आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची खूप बदनामी झाली आहे. 
- राहुल गांधी, नेते, काँग्रेस 

आणखी वाचा - रेप इन इंडियावरून राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ

लोकसभेत काय घडलं?
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं राजकीय भांडवल केलं जात असल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यानी लोकसभेत केली. सभागृहात भाजपच्या महिला सदस्य आक्रमक झाल्या होत्या. स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या सदस्य लोकेत चटर्जी यांनीही जोरदार भाषण करून, राहुल गांधी यांच्या माफीची मागणी केली. दरम्यान, डीएमके नेत्या कनीमोळी यांनी राहुल यांच्या विधानाचं समर्थन करत, देशातील हे वास्तव असल्याचं कनीमोळी यांनी म्हटलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader rahul gandhi reaction over rape in india remark says won`t apologise