"15 वर्षांची मुलगी बाळाला जन्म देऊ शकते, मग लग्नाचं वय कशाला वाढवताय?"

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 January 2021

मुलगी 15 व्या वर्षी आई होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.

नवी दिल्ली- माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलगी जर वयाच्या 15 व्या वर्षी बाळाला जन्म देऊ शकते, तर लग्नाचं वय वाढवण्याची काय गरज आहे, असा अजब प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार मुलींचे लग्नांचे वय वाढवण्याच्या विचारात असताना हे वक्तव्य आलं आहे. 

ट्रम्प यांच्यावरील बंदीनंतर ट्विटरच्या CEOने सोडलं मौन, म्हणाले, 'कारवाईवर...

मुलगी 15 व्या वर्षी आई होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात. मग, मुलीच्या लग्नाचे वय 21 करण्याचा विचार का केला जात आहे. शिवराज सिंहांना मोठा डॉक्टर झाल्यासारखं वाटत आहे का?, असं सज्जन सिंह म्हणाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी यासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर सज्जन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

सोमवारी शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत  ‘नारी सन्मान’कार्यक्रम पार पडला. यावेळी सिंह म्हणाले होते की मुलीचे लग्नाचे वय 18 ऐवजी 21 असायला पाहिजे. त्यानंतर सज्जन यांचं वक्तव्य आलं आहे. भाजप सरकार मुलींचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सज्जन सिंहाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. 

मानलं रावं! एक-दोनदा नव्हे तर तब्बल 157 वेळा दिली ड्रायव्हींग टेस्ट, तेव्हा...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्यात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. अशावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह बघ्याची भूमिका घेत काहीही कारवाई करत नाहीहेत. मुख्यमंत्र्यांनी ढोंगीपणाचं राजकारण सोडून द्यावं, अशी टीका सज्जन सिंह यांनी केली आहे. भाजपनेही यावर पलटवार करत सज्जन सिंहाचं वक्तव्य देशातील मुलींचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत, हे ते विसरलेत का, असा सवाल भाजपने केला आहे. सोनिया गांधी यांनी सज्जन सिंह यांना जाहीर माफी मागण्यास लावून त्यांना पक्षातून काढून टाकावं, अशी मागणी भाजपा नेत्या नेहा बग्गा यांनी केलीये.

दरम्यान, मुलींच्या लग्नाचं वय बदलण्यासाठी मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या लग्नासाठी मुलींचे वय 18 आणि मुलांचे वय 21 निश्चित करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader sajjan singh verma said 15 year old girl can reproduce