
पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखर यांचा भाजपा प्रवेश
चंदीगढ : पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखर यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ते पंजाबमधील काँग्रेसचे अध्यक्ष होते.
(Sunil Jakhar Joins BJP)
यावेळी नड्डा म्हणाले की, "मी सुनील जाखर यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करतो. ते एक अनुभवी राजकीय नेते आहेत ज्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःचे नाव कमावले. पंजाबमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल याची मला खात्री आहे." जाखड यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाईव्ह येत काँग्रेस पक्षाला रामराम केला होता.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ताशेरे ओढल्यानंतर पंजाबमधील माजी काँग्रेसप्रमुख सुनील जाखर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत 'गुडबाय आणि बेस्ट लक काँग्रेस' असं म्हणत काँग्रेस पक्षाला सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.
"माझ्या तीन पिढ्यांनी मागच्या ५० वर्षापासून काँग्रेसची सेवा केली. मी आज पंजाबमधील राष्ट्रवाद, एकता आणि बंधुता या मुद्द्यांवरून काँग्रेसशी असलेलं नात तोडत आहे." असं मत सुनील जाखर त्यांनी भाजपात प्रवेश करताना व्यक्त केलं आहे.