सावरकरांच्या फोटोवरून वाद; विधान परिषदेच्या अध्यक्षांना काँग्रेसचं पत्र

टीम ई सकाळ
Wednesday, 20 January 2021

पत्रात त्यांनी म्हटलं की, सावरकरांनी स्वत:ला वाचवण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. ते जिन्नांची भाषा बोलायचे आणि जिन्ना यांच्याप्रमाणे द्विराष्ट्र संकल्पनेचा विचारही मांडला होता.

लखनऊ - उत्तर प्रदेशात लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी सभागृहाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यावेळी विधान परिषदेत स्वातंत्र्य सैनिकांचे फोटोंमध्ये वीर सावरकरांच्या फोटोचाही समावेश करण्यात आला. यावरून वाद निर्माण झाला असून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी भाजपवर राजकारण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी विधान परिषदेचे अध्यक्ष रमेश यादव यांना पत्रही पाठवण्यात आलं आहे.

काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी वीर सावरकरांचा फोटो हटवण्याची मागणी या पत्रामध्ये केली आहे. पत्रात त्यांनी म्हटलं की, सावरकरांनी स्वत:ला वाचवण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. ते जिन्नांची भाषा बोलायचे आणि जिन्ना यांच्याप्रमाणे द्विराष्ट्र संकल्पनेचा विचारही मांडला होता. सावरकरांनी हिंदू मुस्लिमांमध्ये लढाई घडवून आणली असाही आरोप दीपक सिंह यांनी केला. 

हे वाचा - नामांतराचं वारं लागलं फळाला! भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी 'ड्रॅगन फ्रूट'च केलं बारसं

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या फोटो गॅलरीचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा याविरोधात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव समोर आले होते. त्यांनी म्हटलं होतं की, सावरकरांवरून इतके वाद आहेत. संपूर्ण देशाला माहिती आहे की त्यांनी सुटकेसाठी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती. भाजपने इतिहास शिकायला हवा. सावरकरांचा फोटो लावणं स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केल्यासारखं आहे असंही ते म्हणाले. 

हे वाचा - राजपथावर अवतरणार संतांची मांदियाळी; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं वैभव दाखवणारा चित्ररथ

गेल्या वर्षी कर्नाटकात भाजपने बेंगळुरुतील 47 व्या फ्लायओव्हरचं नाव वीर सावरकर असं ठेवलं होतं. तेव्हा मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सावरकर यांना स्वातंत्र्य सैनिक असं संबोधताना म्हटलं होतं की, 'काही लोकांना त्यांचा अधिकार मिळतो. मात्र वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचा हक्क दिला जात नाही.' त्यावेळीसुद्दा काँग्रेससह विरोधकांनी याविरोधात आवाज उठवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up congress oppose to vir savarkar s photo in vidhan parishad gallary