
काँग्रेसनं झारखंडमधील तीन आमदारांना निलंबित केलंय.
Congress : गाडीत सापडलं पैशांचं घबाड; काँग्रेसच्या तीन आमदारांवर मोठी कारवाई
काँग्रेसनं झारखंडमधील तीन आमदारांना (Jharkhand Congress MLA) निलंबित केलंय. त्यांच्या वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली होती. पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) हावडा इथं या आमदारांच्या एसयूव्ही वाहनातून रोख रक्कम जप्त केली होती, त्यानंतर पैसे मोजण्याचं यंत्र मागवण्यात आलं होतं. रांचीमधील खिजरी येथील आमदार राजेश कच्छप, कोंगारी सिमडेगा येथील कोलेबीरा येथील नमन विक्सेल कोंगारी आणि जामतारा येथील इरफान अन्सारी यांच्यावर काँग्रेसनं ही कारवाई केलीय.
काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा आणि झारखंड काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलीय. झारखंडच्या तीन आमदारांना पश्चिम बंगाल पोलिसांनी हावडा येथून अटक केलीय. त्यांच्या गाडीतून पोलिसांनी कोट्यवधींची रोकड जप्त केलीय. या घटनेमुळं पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडालीय. इरफान अन्सारी, राजेश कच्छप, नमन कोंगारी अशी त्या तीन आमदारांची नावं असून ते एका मोठ्या गाडीतून हावडा इथं आले होते. तिथं रानिहाती येथील महामार्गावर पोलिसांनी तपासासाठी त्यांची गाडी अडवली. तेव्हा त्या गाडीत पोलिसांना पैशांचं घबाड सापडलं.
एका गाडीत भरपूर सारा काळा पैसा भरून नेला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही तपास सुरू केला. आम्ही चेकपोस्टवर झारखंडचे तीन आमदार प्रवास करत असलेली गाडी तपासली असता त्यात पैशांचे घबाड सापडलं आहे. ते पैसे मोजणे सहज शक्य नसून त्यासाठी आम्ही मशीन मागवली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
इरफान अन्सारी हे झारखंडमधील जमतारा मतदारसंघाचे, राजेश कच्छप हे रांची जिल्ह्यातील खिजरी मतदारसंघाचे तर नमन कोंगारी हे सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार आहेत. जप्त करण्यात आलेली गाडी ही आमदार इरफान अन्सारी यांची असल्याचं समजतं. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी व त्यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना नुकतीच ईडीनं अटक केलीय. अर्पिता मुखर्जीच्या घरात पोलिसांना पैशांचं घबाड सापडलं असून कोट्यावधींचं सोनं देखील तेथून जप्त केलंय.