Corona - जगातील एकूण मृत्यूपैकी 10 टक्के भारतात; देशात महाराष्ट्रात सर्वाधिक बळी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

जगभरात झालेल्या मृत्यूंच्या 10 टक्के मृत्यू हे भारतात झाले आहेत. 

गेल्या 8 महिन्यांपासून संपूर्ण जगच कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्यात आहे. भारतात लॉकडाऊन जाहिर केलेल्या घटनेलाही 6 महिने पूर्ण झाले आहेत. आता अनलॉक पाचची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोना प्रादुर्भावाच्या संख्येत जगात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. काल भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही एका लाखांचा टप्पा पार करुन पुढे गेली आहे. जगभरातही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 10 लाखाहून अधिक झाली आहे. थोडक्यात, जगभरात झालेल्या मृत्यूंच्या 10 टक्के मृत्यू हे भारतात झाले आहेत. 

जगात कशी आहे परिस्थिती
जगभराची अवस्था पाहता भारतापेक्षा जास्त मृत्यू हे अमेरिका आणि ब्राझील या देशात झाले आहेत. सध्या अमेरिकेत 2 लाख 12 हजार मृत्यू झाले आहेत तर ब्राझीलमध्ये 1 लाख 45  हजार इतके मृत्यू झाले आहेत. जगभरात दररोज जवळपास चार ते सहा हजार मृत्यू कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. तर गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज जवळपास एक हजार रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. मात्र, आता अलीकडे हा मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. सध्या ते 1.56 टक्के इतकं आहे. 

हेही वाचा - मोरॅटोरियम प्रकरणी केंद्राचा दिलासा, दोन कोटीपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
भारताचा विचार करायचा झाल्यास भारतात सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रातून होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 38 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रा राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.67 टक्के इतका आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी 9 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. भारतातील एकूण सरासरीच्या तुलनेत हा मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात प्रत्येकी पाच हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. 

हेही वाचा - Bihar Election - एनडीएत फूट? लोजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

पंजाबमध्ये सर्वाधिक मृत्यूदर
सध्या सर्वाधिक मृत्यूदर हा पंजाब राज्यात दिसून येत आहे. सध्या पंजाबमधील रुग्णसंख्या ही 1 लाख 15 हजार इतकी असून आतापर्यंत 3500 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तिथला मृत्यूदर हा तीन टक्क्यांवर आहे. गेल्या महिन्यात पंजाबमध्ये दोन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळ, बिहार, आसाम, ओडीसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी मृत्यू रोखण्यात चांगली कामगिरी केली आहे. इथला मृत्यूदरही कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Death Toll Maharashtra has more deaths in India