Bihar Election - एनडीएत फूट? लोजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

भारतीय जनता पार्टी या निवडणूकीत लोजपाला केवळ 15 जागा देऊ इच्छित आहे. तर लोजपाची मागणी मात्र वाढीव आहे.

नवी दिल्ली : बिहार निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारणाला वेग येत आहे. खरं तर कोरोना काळात होणारी ही देशातील पहिली निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र, अजूनही या निवडणूकीत जागावाटपाचे चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाहीये. 

बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये फूट पडणार, असं चित्र जवळपास स्पष्ट दिसू लागले आहे. आज लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे बिहारची निवडणूक लढवण्याची घोषणा करु शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. आज लोजपाच्या संसदीय बोर्डाची मिटींग संध्याकाळी होणार आहे. बिहारच्या आगामी निवडणूकीमध्ये 143 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा लोजपा करु शकते. तसेच, सुरवातीला 56 उमेदवारांची पहिली यादी पक्षाकडून जाहिर केली जाऊ शकते. जागावाटपांच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीमध्ये अजूनही एकमत झालेलं नाहीये. या  पार्श्वभूमीवर भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा लोजपाचे नेते चिराग पासवान यांना पाचवेळा भेटले आहेत. 

हेही वाचा - Covid Update - कोरोनाने देशात घेतले 1 लाख बळी; एकूण रुग्ण 64 लाखांवर
भारतीय जनता पार्टी या निवडणूकीत लोजपाला केवळ 15 जागा देऊ इच्छित आहे. तर लोजपाची मागणी मात्र वाढीव आहे. या निवडणुकीत 42 जागांची मागणी लोजपाकडून करण्यात येत आहे. वास्तविकत: सत्ताधारी जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेड पक्षाचं म्हणणं आहे की आमची लोजपासोबत युती नाही. भाजपा आपल्या वाटणीच्या जागांमधील काही वाटा लोजपाला देऊ शकते. इतकंच नव्हे तर जेडीयू आणि भाजपामध्येही जागावाटपांवरून कुरघोडी सुरु आहे. जेडीयूला भाजपापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र, भाजपा यावर सहमत नाही. जागावाटपांवरुन अजूनही दोन्ही पक्षात एकमत झालेलं नाहीये. 

हेही वाचा - देशातील तब्बल एवढ्या राज्यांत होतेय दलितांची घुसमट; एनसीआरबीची धक्कादायक माहिती

असं म्हटलं जात आहे की, युती तुटल्यानंतरही लोजपा भाजपाच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार नाही. तिकडे केंद्रात युती कायम राहिल. पासवान मंत्री देखील राहतील. लोजपा मोदी, रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांच्या नावानेच ही निवडणूक लढवेल. शिवाय जेडीयूच्याविरोधात उमेदवारदेखील उभे करेल. यावरुन जेडीयू आणि भाजपामध्ये वाद होऊ शकतात.  मोदी से कोई बैर नहीं, नीतीश तेरी खैर नहीं, राज्यातील युती तुटलीच तर लोजपाची घोषणा ही असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election NDA may Split over seat distribution LJP BJP