Corona Update: कोरोनाचे 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र-केरळमध्ये; गेल्या 24 तासांत 123 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 14,301 जणांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 70 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळमध्ये आहेत. 

भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,07,01,193 झाली आहे. देशात एकूण 1,73,740 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1,03,73,606 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1,53,847 लोकांचा बळी घेतला आहे.

गर्भवतींसाठी लस धोकादायक! WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23,55,979 लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 दिवसांत देशातील 147 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तर 18 जिल्ह्यामध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण सापडला नाही. 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांत एकही रुग्ण सापडला नाही तर, 21 जिल्ह्यात 28 दिवसांपासून कोरोना रुग्ण सापडला नाही. 

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत. भारतात आतापर्यंत यूके स्ट्रेनचे 153 रुग्ण आढळून आल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update 70 per COVID19 cases Maharashtra Kerala virus vaccine