Corona : देशात काल 97 रुग्णांचा मृत्यू; राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे संक्रमित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रुग्णसंख्या दोन हजारच्या आसपास स्थिर राहिली होती. मात्र आता ती वाढताना दिसत आहे.

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 13,193 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,09,63,394 वर पोहोचली आहे. काल देशात 10,896 जणांना डिस्चार्ज दिला गेला. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,67,741 वर पोहोचली आहे. काल देशात 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,56,111 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,39,542 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 1,01,88,007 जणांना लस दिली गेली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 5427 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे. काल महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संक्रमित झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. ते सध्या डॉक्टरांचा सल्ला घेत असून त्यांनी प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - ब्रेंकिग : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना संक्रमित; खबरदारी घेण्याचं आवाहन

कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यमंत्री म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रुग्णसंख्या दोन हजारच्या आसपास स्थिर राहिली होती. मात्र आता ती वाढताना दिसत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुग्णवाढ होत असल्याने पुन्हा एकदा कडक नियमांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Marathi Report 19 February