Coronavirus : कोरोनाबाबत 'कहीं खुशी कहीं गम'; जाणून घ्या देश-विदेशातील सद्यस्थिती

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 मार्च 2020

चीन, इराण, जपान, इटली, रोम, फ्रान्स या देशांतील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

नवी दिल्ली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून देशात गोंधळ निर्माण केलेल्या कोरोनाबाबत चांगली बातमी पुढे येत आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावले उचलली. त्याचा परिणाम आज दिसून आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाची लागण झालेल्या भारतातील ११ रुग्णांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे. देशात ८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ११ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच केरळमधील ३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 

लव अग्रवाल पुढे म्हणाले की, दिल्लीतील ७ आणि तेलंगणमधील १ रुग्ण बरा झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांमध्ये ६५ भारतीय, १६ इटालीयन आणि १ कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे. यांच्या संपर्कात आलेल्या ४ हजारहून अधिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. देशातील प्रमुख बंदरांवर २५ हजार ५०४, तर एअरपोर्टवर १४ लाखांहून अधिक प्रवाशांची चाचणी करण्यात आली. 

- मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कारण आहे...

सामूहिक देखरेखीअंतर्गत भारत सरकारने ४२ हजार २९६ नागरिकांची तपासणी केली. यातील २५५९ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यातील ५२२ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात १७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 

देशात कोरोनाचा दुसरा बळी

कोरोना व्हायरसने देशात दुसरा बळी घेतला आहे. राजधानी दिल्लीतील 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा आणखी प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरयाणा, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली. त्याबरोबरच यात्रा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

- १८ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतं ७५ रुपयांना; पण कसं? जाणून घ्या!

परदेशांतील कोरोना बळींची संख्या

इटलीत १७,६६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 250 जणांचा शुक्रवारी (ता.१३) मृत्यू झाला. आतापर्यंत १२६६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इटलीप्रमाणे फ्रान्समध्येही गेल्या २४ तासात १८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये ७९ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. 

- ‘महापोर्टल’कडे बेरोजगारांचे 130 कोटी अडकले

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील

चीन, इराण, जपान, इटली, रोम, फ्रान्स या देशांतील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इराणमधील ११९९ जणांचे नमुने चाचणीसाठी भारतात आणण्यात आले. तसेच चार डॉक्टरांची एक टीम आरोग्य मंत्रालयाने रोमला पाठविली आहे. या सर्वांचे नमुने तपासूनच त्यांना भारतात आणले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Updates in India and Other countries