Corona Updates: मागील 24 तासांत 48 हजार कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 92 टक्क्यांपेक्षा जास्त

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 48 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नवी दिल्ली: सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. याघडीला देशात कोरोनाचे जवळपास पाच लाख कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडाही 6 टक्क्यांच्या खाली गेला आहे. तसेच 92 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

24 तासांत 48 हजार कोरोनामुक्त-
दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 48 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच कोरोना रिकव्हरी रेटही 90 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्याचा देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 92.6 टक्क्यांवर गेला आहे. जवळपास 79 लाख जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील कोरोना बाधितांचा आकडा 85.5 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार नवीन रुग्णांचं निदान झालं असून 490 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने देशात 1 लाख 26 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MP By election live updates: सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा 14 जागा तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर

Pfizer आणि BioNTech च्या लशी डिसेंबरमध्ये-
कोरोना लशीसंदर्भात मोठी बातमी समजत आहे. कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या फाइझर (Pfizer) आणि BioNTech कंपन्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून चांगले परिणाम दिसून आल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोविड लस 2020 च्या शेवटापर्यंत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फाइझरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं की, आमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल हाती आले आहेत. यातून लस 90 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Pfizer ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरल्याने लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pfizer च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, 2020 मध्ये 5 कोटी, तर 2021 पर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याची तयारी आहे. दरम्यान, जगभरातील देश कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक कंपन्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. त्यांचे निकाल लवकरच हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या तीन कोरोना लशी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.  
(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in India recovery rate more than 92 percent