esakal | 18 वर्षांवरील सर्वांना द्या लस; इंडियन मेडिकल असोसिएशनने PM मोदींना लिहलं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून 25 वर्षे वयावरील सर्वांना लस घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

18 वर्षांवरील सर्वांना द्या लस; इंडियन मेडिकल असोसिएशनने PM मोदींना लिहलं पत्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे चिंतेचं कारण बनलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये आधीपेक्षा तीव्र गतीने प्रादुर्भाव वाढत आहे. देशात परवा एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते तर काल 96,982 नवे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता लसीकरणाची मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज बोलून दाखवली जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने आता याबाबतची एक विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे. मेडिकल असोशिएशनने मोदींना पत्र लिहून म्हटलंय की, देशातील 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांना लस घेण्याची मुभा देण्यात यावी. कोरोना लसीकरणाची मोहीमेमध्ये 18 वर्षे वयावरील नागरिकांना लस घेण्याची परवानगी तातडीने देण्यात यावी अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. याआधी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील लसीकरणातील कडक निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. लसीकरण केंद्र सुरु करण्यामध्ये अनेक अटी आणि शर्थी असून त्या आता दूर करण्यात याव्यात आणि लसीकरणाच्या प्रक्रियेस आणखी गती देण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून 25 वर्षे वयावरील सर्वांना लस घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा -,हेही वाचा : २०३६ पर्यंत पुतीन सत्ते राहणार, सविंधानात केला बदल

साडेतीन लाख सदस्य असणारे इंडियन मेडिकल असोसिएशन भारत सरकारच्यावतीने सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेला पाठिंबा देत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे. याआधी लसीकरणास सुरुवात झाल्याबरोबर सर्वांत आधी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली होती आणि आता सामान्य लोकांना लस देण्याची मोहिम सुरु आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार कोरोना बाधित रुग्णाची ओळख पटवून त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, मास्क न घालता एका जागी गर्दी करणे आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवणे तसेच विषाणूच्या स्वरुपात सतत बदल होणे, या काही कारणांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कठोर मेहनत कुचकामी ठरत असून त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव दुसऱ्या लाटेत तीव्र गतीने वाढत असल्याचं या पत्रात मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. कोरोनाचे नियम धुडकावून लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई तसेच बेड्स आणि ऑक्सिजनची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करवून देणं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणं या आणि अशा पूरक गोष्टींवर काम करणं गरजेचं असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याचा दागिना अन् पुरुषांना भन्नाट गिफ्ट

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 96,982 नवे रुग्ण आढळले असून देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,26,86,049 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत 50,143 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,17,32,279 वर पोहोचली आहे. देशात काल 446 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 8,31,10,926 जणांचं कोरोना लसीकरण पार पडलं आहे. 
 

loading image