मोठी बातमी! लशीबाबत भारत बायोटेकची महत्त्वाची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

कोरोना विषाणूवर (Coronavirus) प्रभावी ठरणारी लस निर्माण करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूवर (Coronavirus) प्रभावी ठरणारी लस निर्माण करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. कोरोनावरील लस केव्हा मिळेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच भारताच्या भारत बायोटेकने (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना लशीच्या उपलब्धतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनावरील कोवॅक्सिन (Covaxin) लस 2021 च्या जून महिन्यांपर्यंत लॉन्च होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे.

हैदराबाद स्थित कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी डीसीजीआयला निवेदन देऊन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती. कंपनीच्या योजनेनुसार 12 ते 14 राज्यातील जवळजवळ 20,000 पेक्षा अधिक लोकांचा या चाचणीमध्ये समावेश करुन घेण्यात येणार आहे.  भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी सांगितले की, सर्व आवश्वक परवानगी मिळत गेली तर शक्यता आहे की 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आपल्याला मिळतील. त्यावेळीच लशीच्या क्षमतेबाबत आपल्याला कळून येईल. 

अमेरिकेत कोरोनाचा रेकॉर्डब्रेक! एका दिवसात सापडले 80 हजार नवे रुग्ण

आयसीएमआर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या सहयोगाने कोवॅक्सिन नावाची लस तयार केली जात आहे. यात शक्तिशाली इम्यून सिस्टिम तयार करण्यासाठी कोविड-19 च्या मृत विषाणूंना शरीरात सोडले जाते. साई प्रसाद यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी कटिबद्ध आहोत, पण सरकार आपातकालीन स्थितीसाठी लशीचा वापर करु शकते.

दुसरीकडे, भारतात सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना विषाणूवर प्रभावी ठरु शकणारी कोविशील्ड नावाची लस बनवत आहे. लस निर्माणाच्या बाबतीत सीरम इंस्टिट्यूट भारत बायोटेच्या फार पुढे आहे. सीरम इंस्टिट्यूटने तिसऱ्या टप्पातील चाचणीसाठी स्वंयसेवकांनी निवड करणे सुरु केले आहे. दरम्यान, जगभरातील कोरोना लशींचे काम वेगाने सुरु आहे. अनेक लसी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला किमान एकातरी कंपनीची कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus vaccine Bharat Biotech Covaxin big announcement