esakal | देशात कोरोनाचा उद्रेक; ‘ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गात वाढ

बोलून बातमी शोधा

Corona

‘न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गाचे प्रमाण वाढून देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक; ‘ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गात वाढ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांमधील कोरोनाच्या संसर्गाला रोखणाऱ्या ‘न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी’ घटल्याने फेरसंसर्गाचे प्रमाण वाढून देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षणात समोर आले आहे. शाकाहार करणाऱ्या, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फेरसंसर्गाचे प्रमाण कमी आढळल्याचे या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. परंतु शास्त्रज्ञांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.

महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असून, मृतांची संख्याही वाढली आहे. या उद्रेकाची कारणे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सर्वेक्षणात दिसून आली आहेत. या परिषदेची सहसंस्था असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी’ने (आयजीआयबी) हे सर्वेक्षण केले. यात तपासणी केलेल्या लोकांपैकी २० टक्के लोकांना पुन्हा संसर्ग (सिरो पॉझिटिव्हिटी) झाल्याचे आढळले.

हेही वाचा: घाबरू नका, नियम पाळा; कोरोना योद्ध्यांसोबत मोदींची मन की बात

एकूण सतरा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील १० हजार ४२७ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ‘सीएसआयआर’च्या ४० प्रयोगशाळांमधील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये ‘ॲन्टिबॉडी’ तयार होतात. त्या विषाणूला फेरसंसर्ग करण्यापासून अटकाव करतात. त्यामुळे ज्या लोकांमध्ये ॲन्टिबॉडी तयार झाल्या, त्यांना फेरसंसर्ग होत नसल्याचे मानले गेले.

सर्वेक्षणामध्ये काही वेगळी निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणाऱ्या ‘न्यूट्रलायझिंग ॲन्टिबॉडी’ अनेक लोकांमध्ये गेल्या सहा महिन्यात कमी झाल्या आहेत. त्यामुळे या लोकांना पुन्हा संसर्ग होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु ऑक्टोबरमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. आता त्यात ॲन्टिबॉडीच्या अभावामुळे पुन्हा वाढ होऊ लागली आहे, त्यातून हा उद्रेक होत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.

हेही वाचा: ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना

‘आयजीआयबी’मधील शास्त्रज्ञ शंतनू सेनगुप्ता ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग होण्यापासून ॲन्टिबॉडी संरक्षण देतात. परंतु, आमच्या अभ्यासानुसार २० टक्के लोकांमध्ये पेशींमध्ये संसर्ग करण्यापासून रोखणाऱ्या (न्यूट्रलायझिंग) ॲन्टिबॉडीचा अभाव दिसून आला. त्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होणे आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊन कोरोनाची ही नवी लाट निर्माण झाली असावी.’’

आणखी हवे संशोधन

शाकाहार आणि धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना फेरसंसर्गाचा धोका नाही, असा सर्वेक्षणाच्या नोंदीत उल्लेख आहे. याबाबत विचारले असता शंतनू सेनगुप्ता म्हणाले, ‘‘सर्वेक्षणात काही प्रकरणे तशी आढळली आहेत. मात्र, त्याला लगेच अंतिम निष्कर्ष वा नियम ठरविता येणार नाही. धूम्रपानापासून इतरही धोके आहेत.’’ ‘आयजीआयबी’चे संचालक अनुराग अगरवाल ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘धूम्रपानामुळे संसर्गाचा धोका कमी असे गृहीतक लगेच मांडता येणार नाही. त्यासाठी आणखी संशोधन करावे लागेल.’’