esakal | देशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india toll rise 30 delhi school closed till 31 march

देशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठीही परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीमध्येही राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतात 30 जणांना लागण
कोरोनाच्या सावटामुळे भारत आणि युरोपियन महासंघाचे प्रस्तावित संमेलनही पुढे ढकलण्यात आले आहे. हे संमेलन बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये होणार होते. आता या संमेलनास मोदी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. जगभरात तीन हजार दोनशेपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या या विषाणूचा जगभरात ९५ हजार लोकांना संसर्ग झाला असून, भारतातील बाधितांची संख्या तीसवर पोचली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादेतील एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येने तिशी गाठली आहे.

आणखी वाचा - इटलीत कोरोनाचे बळी 100वर, शाळा, कॉलेज बंद

नवे दिशानिर्देश 
इटली आणि कोरियामधून येणाऱ्या नागरिकांसंदर्भात सरकारने नवे दिशानिर्देश जारी केले असून, तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही ना याचे हमीपत्र त्यांना द्यावे लागणार आहे. राजधानी क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सरकारी आणि खासगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली आहे 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज असून लोकांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

महत्त्वाचे

  • मथुरेतील इस्कॉन मंदिर भाविकांसाठी दोन महिने बंद 
  • संसदेत अनेक खासदार मास्क घालून सभागृहात 
  • दिल्लीत दोन दिवसीय आशियाई सुरक्षा परिषद रद्द 
  • अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराबाहेर तपासणीसाठी विशेष काउंटर्स 
  • केरळमधील तीन कोरोनाग्रस्त रुग्ण ठणठणीत बरे 
  • सिक्कीममध्ये ईनर लाइन परमीट बंद 
  • देशामध्ये औषधांचा तुटवडा नसल्याची सरकारची माहिती 
  • विषाणू रोखण्यासाठी आरबीआय पावले उचलणार 
loading image