रशियाची कोरोनावरील 'स्फुटनिक' लस भारतात पोहोचली, व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

आतापर्यंत लशीच्या किंमतीबाबत निर्णय झालेला नाही. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या मते रशियाची लस इतर देशातील लशींच्या किंमतीच्या मानाने कमी असेल.

नवी दिल्ली- रशियाची कोविड-19 लस तिसऱ्या टप्प्यात मानवी चाचणीसाठी भारतात पोहोचली आहे. स्फुटनिक- व्ही कोरोना विषाणू विरोधातील जगातील पहिली लस मानली जाते. डॉ. रेड्डीज लॅबची मंजुरी मिळाल्यानंतर शुक्रवारी भारतात लस आली आहे. 

टि्वटरवर एक व्हिडिओ समोर आल्यानंतर लस भारतात आल्याचे समजले. व्हिडिओत कंटेनरला स्फुटनिक-व्ही लशीचे प्रतीक चिन्ह लावल्याचे दिसते. कंटेनरचा दरवाजा उघडून एका छोट्या ट्रकने स्थानिक कर्मचारी लस उतरवत आहेत. 

माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांनुसार स्फुटनिक-व्ही 92 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हैदराबादची फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करत आहे. 

हेही वाचा- असीम धैर्य दाखवणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; दिवाळीच्या मोदींनी दिल्या सदिच्छा

रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दमेत्री म्हणाले की, भारताला प्राधान्याने लस दिली जाईल. तथापि, भारतीय नियामक संस्था निर्धारित वेळेत मंजूर करेपर्यंत ही ऑफर देण्यात येईल. जर भारताने मंजुरी देण्यास विलंब लावला तर ही लस दुसऱ्या देशांना दिली जाईल. 

हेही वाचा- फ्रान्सची पुन्हा एकदा मोठी कारवाई, अलकायदाच्या कमांडरसह डझनभर दहशतवाद्यांचा खात्मा

आतापर्यंत लशीच्या किंमतीबाबत निर्णय झालेला नाही. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या मते रशियाची लस इतर देशातील लशींच्या किंमतीच्या मानाने कमी असेल. भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी लवकरच सुरु होईल. तर बेलारुस, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेजुएलासमवेत काही इतर देशांनी रशियातील लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी यापूर्वीच सुरु केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Russian vaccine sputnik v reaches in india