esakal | लग्न करणारच! नवरदेव पॉझिटिव्ह, पीपीई किट घालून नवरी कोरोना वॉर्डात

बोलून बातमी शोधा

नवरदेव पॉझिटिव्ह, पीपीई किट घालून नवरी कोरोना वॉर्डात

नवरदेवासह त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानं कुटुंबिय आणि नातेवाईक 25 एप्रिलला होणारं लग्न पुढं ढकलण्याच्या निर्णयावर आले होते.

नवरदेव पॉझिटिव्ह, पीपीई किट घालून नवरी कोरोना वॉर्डात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तिरुवअनंतपुरम - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे. दरम्यान, या संकटात सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. केरळमधील एका जोडप्यानं अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमधील कोरोना वॉर्डातच लग्नगाठ बांधली. लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर नवरदेवाला कोरोना वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे लग्नासाठी नवरी पीपीई किट घालून कोरोना वॉर्डात पोहोचली आणि तिथेच एकमेकांना हार घालून दोघांनी लग्न केलं.

देशात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांनी विवाहसोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र केरळमधील या जोडप्यानं लग्न करणारच म्हणत कोरोना वॉर्डात सर्व प्रोटोकॉल पाळत लग्न केलं. या दोघांचं लग्न आधीच ठरलं होतं. मात्र त्यादरम्यान नवरदेवाला कोरोनाची लागण झाली आणि मोठा प्रश्न निर्माण झाला.

हेही वाचा: तुमचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

काही दिवसांपूर्वी नवरदेवाला कोरोनाची लागण झाली होती. अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर्डात त्याला दाखल करण्यात आलं होतं. कैनाकरी इथं राहणाऱ्या सारथ आणि अभिरामी यांनी कोरोना वॉर्डात लग्न केलं. अभिरामी जेव्हा पीपीई कीट घालून रुग्णालयात पोहोचली तेव्हा तिथल्या कोरोना वॉर्डातलं वातावरण एकदम बदललं.

परदेशात काम करणारा सारथ त्याच्या लग्नाची तयारी करत असतानाच कोरोनाबाधित झाला. त्यानंतर त्याच्या आईलासुद्धा कोरोनाची लागण झाली. यानंतर दोघांनाही अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमधील कोरोना वॉर्डात दाखल केलं. नवरदेवासह त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानं कुटुंबिय आणि नातेवाईक 25 एप्रिलला होणारं लग्न पुढं ढकलण्याच्या निर्णयावर आले होते.

हेही वाचा: पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला

लग्न पुढे ढकलण्याची तयारी मात्र दोन्ही कुटुंबांची नव्हती. तेव्हा जिल्हाअधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडून यासाठी परवानगी घेण्यात आली. शेवटी कोरोना वॉर्ड़ात लग्न सोहळा पार पडला. याठिकाणी कोरोना रुग्ण लग्नाचे साक्षीदार बनले. कोरोना वॉर्डात नवरीसह एक नातेवाईक पीपीई किट घालून आत गेले. तिथं नवरदेवाच्या आईने दाम्पत्याला हार दिले आणि पुढचे विधी करण्यात आले.