देशात कोरोनाचे जवळपास चार लाख रुग्ण, पण आकडेवारी आहे दिलासादायक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शनिवारी एकाच दिवसांत १४,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली, ता. २० (पीटीआय) : देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शनिवारी एकाच दिवसांत १४,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा आतापर्यंतचा एका दिवसांतील उच्चांक असून एकूण रुग्णसंख्या तीन लाख ९५ हजार ४८ झाली आहे. कोरोनामुळे देशात १२,९४८ जणांचा मृत्यू झाला असून शनिवारी ३७५ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. 

कोरोनावर 103 रुपयांची एक गोळी प्रभावी, कंपनीने दिलीय माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. एकीकडे संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच निम्मे रुग्ण, सुमारे दोन लाख १३ हजार ८३० जण उपचारानंतर कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात एक लाख ६८ हजार २६९ रुग्ण उपचार घेत आहेत. अशाप्रकारे, ५४.१२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सलग नवव्या दिवशी एकाच दिवशी दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 

‘मास्क’ने थोपवली कोरोनाची दुसरी लाट

देशात १ ते २० जून या कालावधीत दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहे. हा गेल्या वीस दिवसांतील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, तमीळनाडू, गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात एकट्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 331 इतकी झाली आहे. राज्यात मृतांची संख्या 5893 वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे एकूण 3829 रुग्ण सापडले होते तर 142 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईतील धारावीत 17 नवे रुग्ण आढळले होते. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2151 झाली आहे. 

87 टक्के भारतीय म्हणतायत यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही

देशभरात 960 वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून, गेल्या 24 तासांमध्ये 1,76,959 नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 7.67 टक्के नमुने कोरोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत 64 लाख 26 हजार 627 नमुना चाचण्या झाल्या आहेत. प्रतिदिन 3 लाख नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 india cross 4 lakh corona patient see details