भारतात कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांच्या वर; संसर्गाचा वेग वाढला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

भारतासह जगभरातील 180 देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. आतापर्यंत 2.26 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून शनिवारी रुग्णांची संख्या 30 लाखांच्या वर पोहोचली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडवारीनुसार देशात 29 लाख 75 हजार 701 रुग्ण होते. सांयकाळपर्यंत हा आकडा 30 लाखांवर पोहोचला. शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासात देशात कोरोनाचे 69 हजार 878 रुग्ण आढळले होते. एका दिवसात सापडलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. भारतासह जगभरातील 180 देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. आतापर्यंत 2.26 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असला तरी सुदैवाने रुग्ण बरं होण्याचं प्रमाण भारतात जास्त आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 22 हजार 577 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. तर कोरोनामुळे भारतात मृत्यू झालेल्यांची संख्या 55 हजार 794 इतकी आहे. भारतातील रिकव्हरी रेट 74.69 टक्क्यांवर पोहचला असून पॉझिटिव्हिटी रेट 6.82 टक्के इतका आहे.

एका दिवसात विक्रमी चाचण्या
भारतात 21 ऑगस्टला 10 लाख 23 हजार 836 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या चाचण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत एकूण 3 कोटी 44 लाख 91 हजार 73 जणांची कोरोना चाचणी कऱण्यात आली आहे. 

हे वाचा - धक्कादायक! कर्मचाऱ्याचा मृतदेह झाकून, सुपरमार्कट ठेवलं सुरुच

निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
देशातील जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र प्रवासाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे प्रकारही घडले आहेत. केरळमध्ये सुरुवातीला आटोक्यात असणारा कोरोना आता सामूहिक संसर्गापर्यंत पोहचला असल्याचं तिथल्या राज्यसरकारने म्हटलं आहे.

दोन वर्षांत संपेल कोरोना - WHO
कोरोना महामारी स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी वेळात नष्ट होऊन जाईल. कोरोना महामारी दोन वर्षांपेक्षा कमी काळात संपण्याची आशा आहे, असं WHO ने म्हटलं आहे. 1918 मध्ये युरोपात स्पॅनिश फ्लू पसरला होता. त्यावेळी जवळजवळ तीन वर्ष या महामारीची साथ युरोपात होती. याकाळात अनेकांना आपला जीव गमवाला लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 updates india 30 lakh positive patient