Fact Check - कन्हैया कुमार जेडीयूत प्रवेश करणार?

टीम ई सकाळ
Tuesday, 16 February 2021

. इतर पक्षातून जेडीयुमध्ये अनेक नेत्यांचा प्रवेश होत आहे. याच पार्श्वभूमीवर जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार हासुद्धा जेडीयुत येणार अशी चर्चा रंगली आहे.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार सरकार वाचवण्यात यशस्वी ठरले. मात्र त्यांच्या पक्षाला राज्यात मोठा फटका बसला. पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राजद आणि भाजपने मुसंडी मारत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. आता सरकार स्थापन झाल्यानंतर नितीशकुमार हे पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष देत आहेत. इतर पक्षातून जेडीयुमध्ये अनेक नेत्यांचा प्रवेश होत आहे. याच पार्श्वभूमीवर जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार हासुद्धा जेडीयुत येणार अशी चर्चा रंगली आहे.

कन्हैया कुमारने मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री आणि जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांची भेट घेतली होती. याशिवाय लोक जनशक्ती पक्षाचे खासदार चंदन सिंह यांनीही नितीश कुमार यांची भेट घेतली होती. दरम्यान, या दोघांच्या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

हे वाचा - राज्यपाल किरण बेदींविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस सरकार अल्पमतात, आणखी 2 आमदारांचे राजीनामे

कन्हैया कुमारच्या भेटीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग यांनी म्हटलं की, आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो, कोणालाही मागे सोडत नाही. जेडीयू एक विचारसरणी असलेला पक्ष आहे. समाजवादी विचारांचे अनेक पक्ष आहेत मात्र त्या घराणेशाही असलेल्या आहेत. 

हे वाचा - कशी चालते 'हिंदू इकोसिस्टीम'?; भाजपच्या द्वेष पसरवणाऱ्या प्रचाराची यंत्रणा उघडकीस

दरम्यान, कन्हैया कुमार जेडीयूत जाणार ही चर्चा तथ्यहीन असल्याचं पत्रक भारतीय कम्युनिस्ट पार्टीने काढलं आहे.  या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की, अनेक माध्यमांमध्ये कन्हैया कुमार जेडीयूमध्ये जाणार अशी शक्यता व्यक्त करणाऱ्या बातम्या आल्या आहेत. मंत्री अशोक चौधरी यांची भेट घेतल्यानंतर शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याला कोणताही आधार नाही. सीपीआयचे आमदार सुर्यकांत पासवान यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत ही भेट घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cpi clarification on kanhai kumar meet with state minister ashok chaudhari