केरळच्या सोने तस्करीचा संबंध डी-गँगशी; 'एनआयए'ची विशेष कोर्टात धक्कादायक माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

याप्रकरणातील आरोपी रमीझ के.टी आणि शराफुद्दीन यांनी टांझानियाला भेट दिली होती, या देशांमध्ये ज्या दुकानांतून बंदुकांची विक्री होते त्यालाही त्यांनी भेट दिली होती.

कोची: केरळमध्ये राजनैतिक मार्गाने झालेल्या सोने तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज विशेष न्यायालयामध्ये धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या डी-गँगशी संबंध असावेत, असा दावा तपास संस्थेकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सातही आरोपींच्या जामीन याचिकांवरील सुनावणीदरम्यान तपास संस्थेने न्यायालयामध्ये ही माहिती दिली. याप्रकरणातील आरोपी रमीझ के.टी आणि शराफुद्दीन यांनी टांझानियाला भेट दिली होती, या देशांमध्ये ज्या दुकानांतून बंदुकांची विक्री होते त्यालाही त्यांनी भेट दिली होती.

जावडेकर-केजरीवाल आमने-सामने, दिल्लीतील प्रदूषणावरून राजकीय धुळवड

रमीझला टांझानियामध्ये हिऱ्यांच्या उद्योगासाठी परवाना हवा होता, यानंतर त्याने संयुक्त अरब अमिरातीमधून सोन्याची तस्करी करण्यास सुरवात केली, ज्या भागांतून त्यांनी तस्करीच्या मार्गाने केरळमध्ये सोने आणले तेथे डी-कंपनी सक्रिय आहे. टांझानियामध्ये डी कंपनीचा सगळा व्यवहार हाताळण्याचे काम हा दक्षिण भारतीय नागरिक फिरोझ हा करतो त्यामुळे या प्रकरणामध्ये डी-गँगचा हात असावा असा संशय आम्हाला असल्याचे ‘एनआयए’च्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितले. 

हे पण वाचा - एकनाथ खडसे आमचे नेते  ते पक्ष सोडणार नाहीत ;  चंद्रकांत पाटील 

शिवशंकर यांना दिलासा

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणाचा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून देखील तपास सुरू आहे. निलंबित आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य सचिव एम. शिवशंकर यांना 23 ऑक्टोबरपर्यंत अटक करू नका, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने आज तपाससंस्थेला दिले आहेत. न्यायालयाने यावेळी चौकशीबाबत तपाससंस्थेला सविस्तर अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले. सोने तस्करीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे डी-गँगपर्यंत पोचले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते सुरेंद्रन यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D Gang connection to the Kerala Gold Smuggling case NIA told kochi special court