esakal | 'घुमान' राष्ट्रीय तीर्थस्थळ घोषित करा : नागरिकांचे केंद्राकडे साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

punjab

'घुमान' राष्ट्रीय तीर्थस्थळ घोषित करा : नागरिकांचे केंद्राकडे साकडे

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि पंजाब संस्कृतीला जोडणाऱ्या संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमानच्या विकासासाठी तेथील नागरिकांनी केंद्र सरकारला साकडे घातले आहे. या गावाला राष्ट्रीय तीर्थस्थळ घोषित करावे, तसेच हा प्रदेश महाराष्ट्रासह अन्य राज्यांना जोडला जावा म्हणून महामार्गांचे रुंदीकरण करावे आणि महाराष्ट्रातील भाविकांसाठी तेथे सुसज्ज यात्रीनिवास बांधावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

श्री हरगोबिंदपूरचे आमदार बलविंदर सिंग लाडी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी घुमाननगरी भावनेचा मुद्दा आहे. अनेक भाविक दरवर्षी दर्शनासाठी तेथे जातात, त्यासाठी रस्त्यांचा विकास गरजेचा आहे. अमृतसर ते घुमान हे अंतर ५० किलोमीटर आहे. हे अंतर कमी वेळात पूर्ण करण्यासाठी त्याचे ६५ मीटर रुंदीकरण आवश्‍यक आहे. परंतु त्याची रुंदी कमी करून अन्य ठिकाणी वाढविली जात आहे, असे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रश्‍नी लक्ष घालण्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा: शिक्षक पर्व २०२१ : पंतप्रधान मोदींनी सुरू केले महत्वाचे उपक्रम

घुमानला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी तेथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील भरविण्यात आले होते. संत नामदेव महाराज हे दोन दशकांहून अधिककाळ या गावी वास्तव्यास होते. त्यामुळे हे गाव मराठी जनतेच्या भावनेशी जोडले गेले आहे. महराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक घुमानमध्ये येतात. या गावात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पंजाब सरकार प्रयत्न करीत आहेत. रस्ते, पाण्याची व्यवस्था केली जात आहे. परंतु काही विकास कामे केंद्राच्या अख्त्यारित आहेत. त्यामुळे केंद्राने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. महामार्ग रुंदीकरण तातडीने करण्याबरोबरच महाराष्ट्रातील भाविकांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त यात्री निवास उभारावा, तसेच या गावाला राष्ट्रीय तीर्थस्थळही घोषित करा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. लाडी यांच्यासमवेत श्री नामदेव दरबार कमिटीचे अध्यक्ष सुखजिंदर सिंग लाली, घुमानचे सरपंच नरिंदर सिंग निंदी, सरबजित संग बावा यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कातील 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

घुमानकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच त्यांचे रुंदीकरणही करावे. जेणेकरून तेथे वाहनांसह येणाऱ्या भाविकांना कोणतीही होणार नाही. जगातील शीख आणि मराठी जनतेचे घुमान गाव श्रद्धास्थान आहे. त्यामुळे राष्ट्रीय तीर्थस्थळाचा दर्जा या गावाला मिळाला पाहिजे, या मागण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.

- बलविंदर सिंग लाडी (आमदार, पंजाब)

शीख धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांचा आयुष्याचा अंतिम काळ नांदेडमध्ये गेला, तर संत नामदेव यांनी आयुष्याचा अंतिम काळ घुमानमध्ये व्यतित केला. त्यामुळे मराठी मातीशी हे गाव जोडले गेले आहे. नांदेडच्या विकासाला जसा केंद्राने हातभार लावला, तसाच आता घुमानचाही विकास करावा. या गावाला लवकर राष्ट्रीय तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे.

- संतसिंग मोखा (संयोजक, विश्‍व पंजाबी संमेलन, पुणे)

loading image
go to top