Delhi Election:अरविंद केजरीवालांचे विरोधी मतदारांना भावनिक आवाहन!

टीम ई-सकाळ
Wednesday, 22 January 2020

बादली मतदारसंघातील "आप'चे उमेदवार अजेश यादव यांच्या प्रचारफेरीत आज, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहभाग घेतला होता.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : देशाच्या राजधानीत गेल्या पाच वर्षांत ज्या कामांची सुरुवात झाली, ती अपूर्ण राहू नयेत, म्हणून 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मत देण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनी विरोधी पक्षांच्या समर्थकांना बुधवारी केले. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाकडे लक्ष देत मत द्या, असे भावनिक आवाहन अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बादली मतदारसंघातील "आप'चे उमेदवार अजेश यादव यांच्या प्रचारफेरीत अरविंद केजरीवाल यांनी "आप'ला मते देण्याचे आवाहन केले. ते उघड्या जीपमध्ये उभे होते. त्यांचे शेकडो कार्यकर्ते हातात पक्षाचे फलक घेऊन आणि "आम आदमी' लिहिलेल्या टोप्या घालून जीपबरोबर पायी चालत होते. या वेळी उपस्थिांतांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि जयजयकार करण्यात येत होता. 'कुटुंबातील ज्येष्ठ मुलाप्रमाणे मी काम केले आहे. कुटुंबाचा भार मोठा मुलगा उचलतो, सर्वांची काळजी घेतो, बहिणीचा विवाह लावून देतो. असेच करण्याचा प्रयत्न मी केला आहे,' असे  अरविंद केजरीवाल म्हणाले.

आणखी वाचा - अरविंद केजरीवाल अर्जच भरू शकले नाहीत!

अरविंद केजरीवाल म्हणाले!

  • "आप' सरकारने पाच वर्षांत दिल्लीकरांसाठी खूप केले 
  • 70 वर्षांपासून प्रलंबित कामे करण्यासाठी पाच वर्षे अपुरी आहेत, अजून वेळ हवा आहे 
  • दिल्लीच्या नागरिकांच्या संपन्न जीवनासाठी जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला 
  • मोफत पाणी आणि वीज उपलब्ध केली 
  • आरोग्य व शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा दिल्या

शिक्षण, आरोग्य सेवेत सुधारणा
राजधानीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात झालेल्या विकासाच्या आधारावर दिल्लीकरांनी मतदान केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'आपल्या शाळा, शिक्षण व्यवस्था व आरोग्य क्षेत्र सुधारण्यासाठी आम्ही खूप काम केले आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान केल्यास तुमच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी कोण घेईल, चांगली आणि परवडणारी आरोग्य सेवा कोण देईल,' असा सवाल करीत मी तुम्हाला विशेषतः कॉंग्रेस आणि भाजपच्या समर्थकांना आवाहन करीत आहे की, तुम्ही तुमच्या पक्षांबरोबरच राहा; पण यंदा आम्हाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाकडे लक्ष देत मत द्या, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Election 2020 arvind kejriwal appeal to delhi voters in election rally