Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. केजरीवाल यांनी माहिती अधिकाराचा कायदा व जनलोकपाल संमत व्हावा यासाठी अण्णा हजारे यांच्यासोबत काम केले. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी त्यांनी आण्णा हजारेंसोबत उपोषणे केली. केजरीवाल हे आयआयटी खरगपूर येथून अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले. आयकर विभागात त्यांनी जॉईंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली व ते राजकारणाकडे वळले. आम आदमी पक्षाने 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यावर पुन्हा झालेल्या निवडणुकीत मात्र आम आदमी पक्षाने भरघोस यश मिळवत 70 पैकी 67 जागा जिंकल्या आणि अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.