Delhi Elections:'या' पाच मुद्द्यांवर दिल्लीत केजरीवालांनी मारली बाजी

delhi election 2020 five factors behind arvind kejriwal hat trick
delhi election 2020 five factors behind arvind kejriwal hat trick

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्लीच्या नाड्या पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या पाच वर्षांत केलेल्या लोकप्रिय घोषणा, विकास कामे, स्वच्छ प्रतिमा याच्या जोरावर दिल्लीनं पुन्हा केजरीवाल यांच्यावर विश्वास टाकलाय. या निकालानंतर देशातील मतदार विधानसभा आणि लोकसभेसाठी वेगवेगळा विचार करून मतदान करतो हे पुन्हा पहायला मिळालंय. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकही जागा मिळवू न शकलेल्या आम आदमी पक्षाला विधानसभेत मात्र स्पष्ट बहुमत मिळालंय. 

स्वच्छ प्रतीमा
केजरीवाल सरकार प्रामुख्यानं भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून सत्तेवर आलं. त्यामुळं पाच वर्षांत केजरीवाल सरकारच्या प्रतिमेकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. गेल्या पाच वर्षांत केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही मोठा आरोप झालेला नाही. विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या आधी मात्र, मनिष सिसोदियांचे ओएसडी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली आणि कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी दिली मात्र, हा प्रकारही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप आपने केला होता. 

महिलांना मोफत प्रवास
अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांच्या आधी दिल्लीत महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत केली. केजरीवाल सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर केल्यामुळं विरोधकांनी या निर्णयावर प्रचंड टीका केली. पण, नागरिकांनी या निर्णयाचं स्वागतच केलं. इतर निर्णयांमुळं लोकप्रियता मिळालेल्या केजरीवाल सरकारला या महिलांच्या मोफत प्रवासाच्या निर्णयानं आणखीनच लोकप्रियता मिळाली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळं महिलांसाठी प्रवासही सुरक्षित झाला आहे. यापूर्वी दिल्लीत महिलांसाठी रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला मोफत बस प्रवास दिला जात होता. 

सरकारी शाळा
दिल्ली केजरीवाल सरकारने राज्य सरकारच्या शाळाचं रूप पालटलं आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या सुविधा, दर्जा या सगळ्यांत अमूलाग्र बदल झाला. शाळेतील या बदलांची दखल देश पातळीवर अनेकांनी घेतली. इतर राज्यांतील नेत्यांनीही दिल्लीतील सरकारी शाळांना भेटी देऊन तेथील बदलांची माहिती घेतली. दिल्लीत गेल्या काही वर्षांत शैक्षणिक खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळं पालकांमध्ये नाराजी होती. त्यामुळं सरकारी शाळांमधील बदलाचं दिल्लीत सर्वच स्तरांतील नागरिकांनी स्वागत केलं. तसच खासगी शाळांमधील फीवरही केजरीवाल सरकारनं नियंत्रण आणल्यानं पालकांनी त्याचं स्वागत केलंय. 

मोफत वीज
लोडशेडिंगमुळं दिल्लीतील सर्वसामान्य वीज ग्राहक त्रस्त होता. लोडशेडिंगनंतरही विजेची भरमसाठ बिलं हा वादाचा विषय बनला होता. गेल्या वर्षी अरविंद केजरीवाल यांनी 200 युनिटपर्यंत सर्वांना वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळं प्रत्येकजण 200 युनिटच्या आत वीज आकार येईल, यासाठी प्रयत्न करू लागला. यामुळं विजेची मोठ्याप्रमाणावर बचत होत असल्याचे दिसत आहे. तसेच ग्राहकही 200 युनिट मोफत वापरण्यास मिळत असल्यामुळं खूष आहेत.  

मोहल्ला क्लिनिक
केजरीवाल सरकारने गेल्या पाच वर्षांत शिक्षणाबरोबरच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडंही गांभीर्यानं लक्ष दिलं. मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना दिल्लीत हिट ठरली आहे. मोहल्ला क्लिनिक ही दिल्लीतील प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत. तिथं आरोग्यासाठीच्या किरकोळ तक्रारींवर मोफत औषधं दिली जातात. तसेच रोगाची तपासणी आणि सल्लाही मोफत दिला जातो. या मोहल्ला क्लिनिकची दखल थेट बराक ओबामा यांनी घेतली होती. अमेरिकेत याच धर्तीवर ओबामा क्लिनिक सुरू करण्यात आली. अर्थात तेथील सत्तांतरानंतर ती क्लिनिक बंद पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com