Tractor Parade:हिंसक आंदोलक आमचे नाहीत; शेतकरी नेत्यांचे 'हात वर'

टीम ई-सकाळ
Tuesday, 26 January 2021

हिंसक आंदोलनाचं आम्ही समर्थन करत नाही, असा सूर शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी आळवला आहे.

नवी दिल्ली : Delhi Tractor Parade:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसत आहे. 'किसान गणतंत्र परेड' अर्थात ट्रॅक्टर परेड मार्ग बदलून दिल्ली शहरात घुसली, त्यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील रस्त्त्यांवर पोलिस आणि शेतकरी यांच्यात झडप होत असल्याची दृष्यं, टीव्हीवर दिसत आहेत. त्याचवेळी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी हे आंदोलन आपलं नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. हिंसक आंदोलनाचं आम्ही समर्थन करत नाही, असा सूर शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी आळवला आहे.

आणखी वाचा - दिल्लीत संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक

आणखी वाचा : दिल्ली पोलिसांची गांधीगिरी, अधिकारी बसले रस्त्त्यावर

संयुक्त किसान मोर्चाचा घटक नसलेल्यांकडून हिंसक आंदोलन झाले आहे. आम्ही अशा हिंसक कृत्याचं समर्थन करत नाही. मूठभर लोकांमुळं संपूर्ण शेतकरी आंदोलन बदनाम होत आहे. त्यामुळं आम्ही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी हिंसक मार्गानं आंदोलन करू नये.
- योगेंद्र यादव, ज्येष्ठ नेते

दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक आंदोलन करणारे शेतकरी आहेत की दुसरे कोणी, याविषयी शंका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करत नाही. आंदोलक शहरात घुसले असले तरी, आता पोलिसांनी आक्रमक होऊ नये, शेतकऱ्यांना आले त्या मार्गाने परत जाऊ द्यावे.
- किशोर तिवारी, शेतकरी नेते

आणखी वाचा - दिल्लीत शेतकरी आक्रमक, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. काही मीडियाचे लोक आणि सोशल मीडिया आंदोलन हिंसक झाल्याचं सांगत आहे. ज्या हिंसक घटना घडल्या आहेत. त्यांचं आपण समर्थन करत नाही. शांतता हिच आपली ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुराग्रह थांबवावा. मुख्य आंदोलन हिंसेच्या बाजूने नाही. अशा घटना मुख्य आंदोलनाचा भाग नाही.
- अजित नवले, शेतकरी नेते

मूठभर लोकांनी जर एखाद्या कायद्याला, विरोध केला तर आपण लोकशाही देशात आहोत का? लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने कायदे केले आहेत. त्याला काही लोकं विरोध करत असतील तर ते कायदे बदलायचे का?
- सदाभाऊ खोत, शेतकरी नेते, रयत क्रांती संघटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor parade violence farmer leaders reactions