दिल्लीत शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; आंदोलकांना आवाहन

टीम ई सकाळ
Tuesday, 26 January 2021

दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शेतकरी दिल्लीतील लाल किल्ल्यावरही गेले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱी संघटनांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यावरून गेल्या दोन आठवड्यात बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर अखेर शांततापूर्ण मार्गाने आंदोलनासाठी परवानगी दिली गेली. मात्र दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शेतकरी दिल्लीतील लाल किल्ल्यावरही गेले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही मारा केला. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून आंदोलनात सुरु झालेल्या हिंसाचारानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत असं म्हटलं आहे. हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्याच देशाचं होईल असं म्हणत राहुल गांधी यांनी देशहितासाठी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली.

हे वाचा - Tractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

दरम्यान, या प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोणतीही हिंसा होणरा नाही आणि यापुढचे आंदोलन शांततेत करतील असंही ते म्हणाले. तसंच पोलिसांनी रिंग रोडवरून रॅलीसाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी संख्या बघून परवानगी द्यायला हवी होती असंही टिकैत यांनी सांगितलं.

हे वाचा - Tractor Parade: दिल्ली पोलिसांची 'गांधीगिरी', आंदोलकांनी ऐकलं नाही म्हणून अधिकारीच बसले रस्त्यावर

योगेंद्र यादव यांनी हिंसाचाराच निषेध केला. जे झालं ते लाजिरवाणं आणि घृणास्पद आहे. आपल्याला असं काही करायचं नाही. हिंसा करणारे आंदोलक आमचे नाहीत असंही त्यांनी म्हटलं. हिंसा थांबवून शांततेनं आंदोलन करा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor parade violence reaction rahul gandhi twitter