ट्रॅक्टर रॅली हिंसाचार - योगेंद्र यादव यांच्यासह 20 नेत्यांनी दिल्ली पोलिसांची नोटीस

टीम ई सकाळ
Thursday, 28 January 2021

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी राकेश टिकैत, योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यासह राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा कमी होताना दिसत आहे. दरम्यान, हिंसाचारामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघाऱ घेतली आहे. बुधवारी ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती आणि चिल्ला बॉर्डरवरच्या शेतकरी किसान युनियनने आंदोलनात सहभागी होणार नाही असं सांगितलं आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी राकेश टिकैत, योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दंगल, गुन्हेगारी कट, खूनाचा प्रयत्न यांसारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीवेळी निमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी योगेंद्र यादव, बलदेस सिंह सिरसा, बलबीर एस राजेवाल यांच्यासह 20 शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांचे म्हणणे आहे की, शेतकरी संघटनांनी पोलिसांसोबत विश्वासघात केला. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असाही आरोप शेतकरी नेत्यांवर केला. 

हे वाचा - शेतकरी शब्द पाळणार नाहीत याचा अंदाज आलेला; नेत्यांनी विश्वासघात केल्याचा पोलिसांचा आरोप

दिल्लीच्या वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे की, दिल्ली ते गाझियाबाब महामार्ग सुरु करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी या मार्गावर वाहतूक सुरळीत झाली होती. लाल किल्ल्यावरील सुरक्षा कडक आहे. किल्ल्याच्या चारही बाजुला सुरक्षादलांना तैनात करण्यात आलं आहे. लाल किल्ल्यावर हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूसह लख्खा सिधाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Viral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने कोरोना लस...

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, दोघांविरोधात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. हिंसाचार प्रकारात सिद्धूचं कनेक्शन समोर आलं होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धूने मध्यरात्री एक पोस्ट केली होती. यात त्यानं सांगितलं होतं की, दिल्लीकडे मोर्चा नेऊ असं म्हटलं होतं. जेव्हा मोर्चा सुरु केला तेव्हा ठरलेल्या मार्गावरून फक्त तीनच हजार आंदोलक गेले. बाकीचे लाल किल्ल्याच्या दिशेने गेल्याचंही तो म्हणाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor rally police send notice to farmer leaders