शिवसेनेनंतर काँग्रेसचं 15 रुपयांत जेवणाचं आश्वासन

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 2 February 2020

नवी दिल्ली Delhi Election 2020  : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना कॉंग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. 300 युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक 72 हजार रुपये देणारी "न्याय' योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली. बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याच्या आश्‍वासनाचाही समावेश आहे. तसेच 15 रुपयांत जेवण देणारी केंद्र सुरू करण्याचं आश्वासनही काँग्रेसनं दिलं.

नवी दिल्ली Delhi Election 2020  : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठवडा शिल्लक असताना कॉंग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. 300 युनिटपर्यंत मोफत वीज, गरीब कुटुंबीयांना वार्षिक 72 हजार रुपये देणारी "न्याय' योजना लागू करण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली. बेरोजगार तरुणांना महागाई भत्ता देण्याच्या आश्‍वासनाचाही समावेश आहे. तसेच 15 रुपयांत जेवण देणारी केंद्र सुरू करण्याचं आश्वासनही काँग्रेसनं दिलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष; तसेच केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत कॉंग्रेसचा प्रचार झाकोळला गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने लोकानुनयी आश्‍वासनांची खैरात करणाऱ्या जाहीरनाम्याची आज घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार आनंद शर्मा; तसेच माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

आणखी वाचा - दिल्ली निवडणुकीत सर्वाधिक गुन्हे 'आप'च्या उमेदवारांवर

"आप'च्या वीज, पाणी मोफत देण्याच्या योजनेप्रमाणेच कॉंग्रेसनेही जाहीरनाम्यात या घोषणांचा समावेश केला. 300 युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देताना 300 ते 400 युनिटपर्यंत 50 टक्के सवलत मिळेल. 400 ते 500 युनिटपर्यंत 30 टक्के आणि 500 ते 600 युनिटपर्यंत 25 टक्के सवलतीचे मधाचे बोट कॉंग्रेसने जाहीरनाम्यात लावले. विशेष म्हणजे "न्याय' योजनेवरील धूळही कॉंग्रेसने झटकली आहे. राहुल गांधींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आश्‍वासन कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे आश्‍वासन देण्यात आले आहे; तसेच पदवीधारक बेरोजगारांना 5000 रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण असलेल्या बेरोजगारांना 7500 रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचेही आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले. 

या आहेत जाहीरनाम्यातील घोषणा 

  • दिल्लीकरांना 300 युनिट वीज मोफत मिळणार 
  • 20 हजार लिटर पाणी मोफत देणार 
  • गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देणारी "न्याय' योजना लागू करणार 
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार 
  • ज्येष्ठ नागरिकांना शहरी बससेवेमध्ये मोफत प्रवास करता येईल 
  • ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवृत्तिवेतन योजना लागू करणार 
  • मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे मोफत शिक्षण देणार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi vidhan sabha 2020 congress manifesto 15 rupees meal