#DelhiViolence : दिल्ली पेटविणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घाला!

Delhi-Violence
Delhi-Violence

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) राजधानी दिल्लीत पेटलेला आंदोलनाचा वणवा मंगळवारी (ता.२५) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. ईशान्य दिल्लीतील चार विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून आंदोलकांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत तेरा जणांचा बळी गेला असून, ५६ पोलिस कर्मचाऱ्यांसह दोनशे लोक जखमी झाले आहेत. 

ईशान्य दिल्लीतील जाफराबाद-मौजपूर-सीलमपूर-गोकूळपुरी, कबीरनगर, कर्दमपूर या टप्प्यातील ब्रह्मपुरी, मौजपूर भागांत आज दुपारपासून पुन्हा जाळपोळ, लुटालूट व दगडफेकीच्या घटना घडल्या. सायंकाळी हा सगळा भागच सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला होता. जाफराबादमध्ये आंदोलनकर्त्या महिलांना रस्त्यांवरून हटविण्यात आले असून, आता हा रस्ता मोकळा झाला आहे.

शहरातील तणाव पाहता ईशान्य दिल्लीतील सर्वच शाळा उद्या बंद राहणार असून, येथील परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली आहे. ‘सीबीएसई’कडूनच आज ही माहिती देण्यात आली. दिल्लीस लागून असलेल्या शेजारील राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या असून, पश्‍चिम उत्तर प्रदेशातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीस लागून असणाऱ्या यूपीतील नोएडा, गाझियाबाद, हापूड, अलिगड, मुझफ्फरनगर आणि संभळमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी काल मध्यरात्रीपासून विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर २-३ बैठका घेतल्या आहेत. आज त्यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी व सर्व पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास भजनपुरा भागात पुन्हा दोन गटांत दगडफेक सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 

लष्कराची गरज नाही 

काही भागांत हिंसाचार कायम असला, तरी दिल्लीत सैन्याला पाचारण करण्याची गरज नसल्याचे गृहमंत्रालयाच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे. पोलिस व निमलष्करी दलांच्या किमान ७३ तुकड्या दंगलग्रस्त भागांत पाठविण्यात आल्या आहेत. आणखी सुरक्षाबळ लवकरच पाठविले जाईल, असे गृहमंत्र्यांनी केजरीवाल यांना सांगितले.

तथापि, ईशान्य दिल्लीत दगडफेक सुरूच असून, दंगलखोरांनी एका अग्निशामक बंबाला आग लावली व अनेक दुकानांवरही तुफान दगडफेक केली. ब्रह्मपुरी, कर्दमपुरी, गोकूळपुरी, मौजपूर यातील काही दंगलग्रस्त भागांत पोलिसांनी आज दिवसभरात वारंवार फ्लॅग मार्च केले. 

केजरीवालांचे म्हणणे 

दरम्यान, केजरीवाल यांनी शहांबरोबरची उच्चस्तरीय बैठक करण्यापूर्वी दिल्लीच्या सर्व ७० आमदारांबरोबर चर्चा केली. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही व ते ‘वरून’ आदेशाची वाट पाहत थांबल्यानेच हिंसाचार आटोक्‍याबाहेर गेल्याचे अनेक आमदारांनी आपल्याला सांगितले, असे केजरीवाल यांनी सांगितले. दंगलखोरांपैकी अनेक लोक दिल्लीबाहेरून आले होते, असेही केजरीवाल यांचे म्हणणे आहे. शहांबरोबरची बैठक संपल्यावर दिल्लीला शांत करण्यासाठी सर्व पक्षांनी राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकूळपुरी, जौहरी एन्क्लेव्ह व शिवविहार स्थानके आजही बंद ठेवली. ट्रम्प यांच्या बैठका आज होणार होत्या त्या राजघाट, हैदराबाद हाउसजवळच्या परिसरातील केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, पटेल चौक आदी स्थानके काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. 

नेत्यांविरोधात याचिका 

चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेतर्फे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात शाहीनबाग आंदोलनाबाबत उद्या (ता. २६) सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या तिन्ही मध्यस्थांनी शाहीनबागेत जाऊन चर्चा केल्यावर आपापले अहवाल बंद लखोट्यांत सोमवारी न्यायालयाला सादर केले होते. वजाहत हबीबउल्ला यांच्या अहवालावर न्यायालय उद्या सर्वप्रथम सुनावणी करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com