आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली; विशेष विमानांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होणार नाही अशी माहिती डीजीसीएने दिली आहे. फक्त विशेष विमानांनाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी देण्यात आली आहे. 

डीजीसीएने गुरुवारी आदेश जारी केले आहेत. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी असून परवानगी असलेल्या विशेष विमानांना हा नियम लागू नाही.

डीजीसीएच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतातून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर असलेली बंदी 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र काही निवडक मार्गांवर उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने 23 मार्च ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक रद्द केली होती. 

हे वाचा - बँकेतील कामे उरकून घ्या; डिसेंबरमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी

नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी असताना वंदे भारत मिशन मोहिमेंतर्गत सरकारच्या मंजुरीनंतर काही देशांमध्ये विमानसेवा सुरु आहे. याबाबत भारताने संबंधित देशांच्या सरकारांसोबत जुलै महिन्यात एअर बबलचा करार केला होता. वंदे भारत मिशन मोहिमेंतर्गत लाखो लोकांना भारतात परत आणण्यात आलं तर देशात अडकलेले लोक मायदेशी परतले. 

हे वाचा - RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर

देशात आतापर्यंत 92 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी जवळपास 86 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे देशातील 1 लाख 35 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dgca says prohibition on foreign extended till 31 dec allow only special flights