शेतकरी आंदोलन ते अनुच्छेद ३७०; कोणत्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सोडलीय सरकारी नोकरी?

सकाळ ऑनलाईन
Monday, 14 December 2020

एखाद्या आंदोलनासाठी सरकारच्या व्यवस्थेचा विरोध करत राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अशाच काही चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्यांवर टाकलेली एक नजर.

नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाला अनेक अभिनेते, गायक आणि खेलाडूंनी समर्थन दिले आहे. त्यातच आता पंजाबचे निलंबित डीआयजी लखविंदर सिंह जाखड यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आपला राजीनामा दिला आहे. लखविंदर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. एखाद्या आंदोलनासाठी सरकारच्या व्यवस्थेचा विरोध करत राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अशाच काही चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्यांवर टाकलेली एक नजर.

लखविंदर सिंह

लखविंदर सिंह यांनी पंजाबच्या प्रमुख सचिवांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांतीपूर्ण पद्धतीने प्रदर्शन करणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांसोबत आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. 

IAS अधिकाऱ्यानं सुचवला रामबाण उपाय, 'शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवायचंय तर......

शाह फैजल

2010 मध्ये प्रशासकीय सेवेत टॉप करुन देशात प्रसिद्ध झालेले जम्मू-काश्मीरचे शाह फैजल यांनी मागील वर्षी जानेवारीमध्ये आपली नोकरी सोडली होती. त्यांनी फेसबुकवर आपला राजीनामा घोषित केला होता. काश्मीरमध्ये होणाऱ्या हत्त्या आणि केंद्र सरकार तेथे करणारी दडपशाही हे कारण त्यांनी यामागे सांगितले होते. शाह फैजल यांनी आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते.

कन्नन गोपीनाथन

आयएएस अधिकारी राहिलेले कन्नन गोपीनाथन 2018 मध्ये चर्चेचा विषय ठरले होते. केरळमध्ये आलेल्या पुरादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले. पण, जेव्हा केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा गोपीनाथन यांनी याला विरोध दर्शवत आपला राजीनामा दिला. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दडपशाहीवर वारंवार टीका केली. 

घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मार्च 2021 पूर्वी घ्या PM आवास योजनेचा लाभ

शशिकांत सेंथिल

कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं होतं की, ''माझ्यासाठी अशावेळी प्रशासकीय अधिकारी या नात्याने काम करत रहाने अनैतिक आहे. देशाच्या लोकशाहीचे मूलभूत आधारस्तंभ धुळीस मिळत आहेत.'' सेंथिल यांनी काँग्रेस पार्टीचा हात पकडला होता. 

अब्दूर रेहमान

महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी राहिलेले अब्दूर रेहमान यांनी मागील वर्षी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात आपला राजीनामा दिला होता. प्रस्तावित कायदा संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात असल्याचं म्हणत त्यांनी नोकरी सोडली होती. राज्यसभेत विधेयक पास होताच त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DIG resigns in support of farmers which officers quit government jobs