
रुग्णालयात स्ट्रेचरवर ठेवलेल्या मुलीच्या मृतदेहाचे लचके तोडून कुत्रा खात असल्याचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले आहे.
संभल - जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचरवर ठेवलेल्या मुलीच्या मृतदेहाचे लचके तोडून कुत्रा खात असल्याचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या मुलीला संभलमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात तिचा मृतदेह स्ट्रेचरवर पांढऱ्या चादरीने झाकलेला असताना एक भटके कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचा २० मिनिटांचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.
मुलीच्या कुटुंबाने रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणा आरोप केला आहे. मुलीला रुग्णालयात आणले तेव्हा दीड तासांपर्यंत तिच्यावर कोणतेही उपचार झाले नाही, असा आरोप मुलीचे वडील चरणसिंह यांनी केला. समाजवादी पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करीत रुग्णालयाच्या प्रशासनावर टीका केली आहे.
‘‘ही घटना अत्यंत गंभीर आहे. याला जबाबदार असलेल्या वॉर्डबॉय आणि स्वच्छता कर्मचाऱ्यास निलंबित केले असून तातडीच्या सेवेत असलेले डॉक्टर आणि फार्मासिस्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील वर्मा यांनी सांगितले. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमिता सिंह म्हणाल्या.
रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर
रुग्णालयाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या समस्या असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. रुग्णालयाच्या सांगण्यानुसार या समस्येबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मुलीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून काही तिचे कुटुंबीय बाहेर गेलेले असताना ही घटना घडल्याची माहिती एका डॉक्टरने दिली.