
पैसे मोजता मोजता मशीनही थकलं; 'खाणी'त १९ कोटी दडवलेली पूजा सिंघल कोण आहे?
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांच्यासह अनेक जणांवर कारवाई केली. ईडीने त्यांच्या जवळच्या सहायकाकडून जवळपास १९ कोटी रुपये जप्त केले आहेत. पूजा यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त केले असून १.८ कोटी रुपये इतर ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहेत. कोण आहेत या प्रशासकीय अधिकारी पूजा सिंघल? जाणून घ्या!
पूजा सिंघल २००० बॅचच्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. सिंघल यांनी मागच्या भाजपा सरकारमध्ये कृषी सचिवपासून सध्याच्या सरकारमध्ये पर्यटन आणि उद्योग सचिव अशा अनेक प्रमुख पदांवर काम केलं आहे. त्यांचे पती अभिषेक झा पल्स संजीवनी हेल्थकेअर प्रायव्हेट हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
हेही वाचा: IAS अधिकाऱ्याच्या सहायकांकडून १९ कोटी रुपये जप्त, ईडीची मोठी कारवाई
वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी देशातल्या सर्वात प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. पूजा सिंघल यांचं पहिलं लग्न प्रशासकीय सेवेतच असलेल्या राहुल पुरवार यांच्याशी झालं होतं. पण लवकरच त्या दोघांत वाद सुरू झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सिंघल यांनी अभिषेक झा यांच्याशी लग्न केलं.
अनेक घोटाळ्यांमध्ये यापूर्वीही आलं होतं नाव
झारखंडमध्ये उपायुक्त म्हणून काम करत असताना पूजा सिंघल यांनी मनरेगा योजनेंतर्गत २ स्वयंसेवी संस्थांना ६ कोटी रुपये दिले होते. या प्रकरणी विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण नंतर त्यांना या प्रकरणात क्लिनचिटही मिळाली होती. तर खुंटी जिल्ह्यात उपायुक्त असताना मनरेगा योजनेमध्ये १६ कोटींच्या घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. याच प्रकरणाची चौकशी सध्या ईडी करत आहे. याआधी पलामूमध्ये उपायुक्त असताना पूजा सिंघल यांच्यावर नियम डावलल्याचा आरोप होता. अशाच प्रकारे अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे.
Web Title: Ed Seized 19 Crores Cash Who Is Puja Singhal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..