esakal | पत्नीचा मृतदेह सायकलवरुन नेण्याची वेळ; कोरोनाच्या भीतीने कोणी जवळ येईना

बोलून बातमी शोधा

up

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयस्कर व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह सायकलवर घेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तासंतास फिरावं लागलं आहे.

कोरोना: पत्नीचा मृतदेह सायकलवरुन नेण्याची वेळ
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

लखनऊ- उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयस्कर व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह सायकलवर घेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तासंतास फिरावं लागलं आहे. कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी परिसरात पत्नीचा मृतदेह पुरण्यास परवानगी दिली नाही. यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला अस्वस्थपणे बसलेला दिसत आहे आणि रस्त्याच्या मधोमध एका सायकलवर मृतदेह पडला आहे.

गावकऱ्यांनी वयस्कर व्यक्तीला अंत्यसंस्कार करु दिला नाही. कोरोना विषाणूच्या भयापोटी कोणी गावकरी त्यांच्या मदतीलाही आला नाही. असे असले तरी मृत महिला कोरोना पॉझिटिव्ह होती का, याबाबत प्रशासनाने माहिती दिलेली नाही. वयस्क पती आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन अनेक तास रस्त्यावर फिरत होता. पण, कोणीही त्याच्या मदतीला पुढे आला नाही, किंवा त्यांचे दु:ख समजून घेतले नाही. उटल त्याला गावातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले.

हेही वाचा: कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार; भारतात आणखी ६ कीट दाखल

पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, त्यांनी रामघाटमध्ये महिलेचे अंत्यसंस्कार केले. राजकुमारी असं मृत महिलेचं नाव असून त्या 50 वर्षे वयाच्या होत्या.जौनपूर जिल्ह्यातील आंबेरपूरच्या रहिवाशी असणाऱ्या राजकुमारी या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांचे पती तिलकधारी सिंह यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलने त्यांना अॅम्बुलन्समधून गावी पाठवले.

हेही वाचा: ICU बेड मिळाला नाही! योगी सरकारमधील आमदाराचा मृत्यू

पत्नीचा अंत्यसंस्कार करायचा होता, पण त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. त्यामुळे त्याने स्वत: पत्नीचा मृतदेह सायकलवर ठेवला आणि तिच्या अंत्यसंस्कारासाठी जागा शोधू लागला. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. योगी सरकारवर आणि प्रशासनावर या मुद्द्यावरुन टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती गंभीर बनत असल्याचं हे एक उदाहरण आहे.