बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावेळी विशेष काळजी घेणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा टप्पा तीन नोव्हेंबर तर तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला होईल. विधानसभा निवडणूकीचा निकाल 10 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, कोरोनाच्या संकटकाळात ही निवडणूक पार पडणार असून तीन टप्प्यात ही निवडणूक घेतली जाईल. पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा टप्पा तीन नोव्हेंबर तर तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला होईल. विधानसभा निवडणूकीचा निकाल 10 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन
तिन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 16 जिल्ह्यातील 71 मतदारसंघात मतदान घेतलं जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन नोव्हेंबरला 17 जिल्ह्यात 94 मतदारसंघात मतदान घेतलं जाईल. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यात मतदान घेतलं जाणार आहे. या जिल्ह्यात 78 मतदारसंघाचा समावेश आहे. शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबरला बिहारच्या जनतेचा कौल समजणार आहे. 
दरम्यान, बिहारमधील अनेक पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांनी सांगितलं की, कोरोनाच्या संकटात लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेची विशेष काळजी गेतली जाईल. निवडणूक आयोग यासाठी पूर्णपणे तयार आहे. निवडणूक कार्यक्रम तयार करताना याची पूर्ण काळजी घेतली जाईल. 

हेही वाचा- प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली
निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनिल अरोरा म्हणाले की, कोरोना काळात देशच नाही तर जगातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. बिहारमध्ये 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीत एका पोलिंग बूथवर मतदारांची संख्या 1500 वरून 1000 करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयुक्तांनी सद्य परिस्थिती पाहून मतदानासाठीची वेळसुद्धा एक तासाने वाढवली आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election commission announced bihar assembly poll dates today