प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

डॉक्टर शेखर बसु अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. शालेय शिक्षण कोलकात्यात झालेल्या डॉक्टर बसुंचे मुंबईशी खास नाते होते.

कोलकाता - भारताचे प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारावेळीच गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर शेखर बसु यांना किडनीचा विकार होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवसही झाला होता. 15 सप्टेंबरला शेखर बसु यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची ऑक्सिजन पातळी खालवली होती तसंच किडन्यासुद्धा निकामी झाल्या होत्या. 

डॉक्टर शेखर बसु अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात बसु यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी शेखर बसु यांनी तयार केली होती.

शेखर बसु यांचा जन्म 20 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता. पद्मश्री डॉक्टर बसु यांचे शालेय शिक्षण कोलकात्यात झाले. डॉक्टर बसुंचे मुंबईशी खास नाते होते. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून 1974 ला त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं. त्यानंतर न्यूक्लिअर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी BARK मधून एक वर्षाचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणानंतर 1975 ला रिअॅक्टर इंजिनिअर म्हणून नियुक्त झाले होते. 

हे वाचा - काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र हुतात्मा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून डॉक्टर बसु यांना श्रद्धांजली वाहिली. पद्मश्री बसु यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अणु विज्ञान संशोधनाचे प्रमुख होते असं म्हणत राष्ट्रपतींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेखर बसु यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. मोदींनी म्हटलं की, प्रसिद्ध अणु शास्त्रज्ञ शेखर बसु यांनी अणु विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात भारताला आघाडीच्या देशांमध्ये नेऊन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nuclear scientist shekhar basu passes away due to corona