Delhi Election:निवडणूक आयोगाचा भाजपला दणका; अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मांना लिस्टमधून हटवा

टीम ई-सकाळ
Wednesday, 29 January 2020

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली निवडणुकीत प्रचारासाठी आयोजित एका सभेमध्ये 'देशातील गद्दारांना गोळ्या घाला' अशा आशायच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : भारतीय जनता पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं दणका दिलाय. वादग्रस्त विधानं करणारे भाजप नेते अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावरून आयोगानं पक्षाला फटकारलंय. त्यामुळं दोन्ही नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त विधानांची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय. या दोन्ही नेत्यांची नावं भाजपच्या स्टार प्रचारकांच्या लिस्टमधून हटवण्याचे आदेश आयोगानं भाजपला दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय होती विधानं?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली निवडणुकीत प्रचारासाठी आयोजित एका सभेमध्ये 'देशातील गद्दारांना गोळ्या घाला' अशा आशायच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या. यावरून अनुराग ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही झाले. त्यांना नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता निवडणूक आयोगानंही त्याची गंभीर दखल घेतली आहे. 

आणखी वाचा - साईना नेहवाल उतरली राजकारणात 
आणखी वाचा - मोठा आरोप:कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित 

तिथं (शाहीन बाग) लाखो लोक एकत्र येतात. आता दिल्लीच्या लोकांनी विचार करायला हवा आणि निर्णय घ्यायला हवा. ते तुमच्या घरांमध्ये घुसतील. तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार करतील. त्यांची हत्या करतील. आजच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुम्हाला दर वेळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी वाचवायला येणार नाहीत.
- प्रवेश वर्मा, भाजप नेते (दिल्ली निवडणूक प्रचारसभेतील वादग्रस्त भाषण)

पाठोपाठ वादग्रस्त वक्तव्ये
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या मॉडेल टाऊन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले होते, आयोगाने त्याचीही गंभीर दखळ घेतली होती आणि ते ट्विट डिलिट करायला लावले होते. त्या ट्विटमध्ये म्हटले होते की, काँग्रेस आणि आपने शाहीन बागमध्ये मिनी पाकिस्तान उभा केलाय. त्याच्या विरोधात 8 फेब्रुवारीला संपूर्ण हिंदुस्तान उभा राहणार आहे. जेव्हा जेव्हा देशद्रोही व्यक्तीमत्वं भारतात पाकिस्तान उभा करतील. तेव्हा तेव्हा देशभक्तांना हिंदुस्तान उभा राहील, असं ट्विट मिश्रा यांनी केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election commission asks bjp to remove anurag thakur pravesh verma from star campaigner list