कोवॅक्सिनला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी? एम्स प्रमुखांनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 January 2021

भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

नवी दिल्ली- भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लशींचा समावेश आहे. भारत बायोटेकच्या लशीला मंजुरी मिळताच राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरावर आक्षेप घेतला आहे. भारत बायोटेकचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण पूर्ण झाले नसताना लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी का दिली, असा सवाल शशी थरुर आणि जयराम रमेश यांनी केंद्र सरकारला केला आहे. 

एम्सचे All-India Institute of Medical Sciences प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणातून जात आहे, त्यामुळे ती बॅकअप लस म्हणून काम करेल, असं ते म्हणाले आहेत. मला वाटतं की सीरमची लस मुख्य लस म्हणून काम करेल आणि जर पुन्हा संक्रमण होत असल्याचं आढळ्यास भारत बायोटेकची लस बॅकअप म्हणून काम करेल, असं स्पष्टीकरण गुलेरिया यांनी दिलं आहे. 

जगात प्रचंड गतीने पसरत आहे आणखी एक महामारी; इबोलाचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा...

कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्यास आपात्कालीन परिस्थितीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिचा वापर करता येईल. तसेच दुसऱ्या बाजूला भारत बायोटेकचे लशीवरील परिक्षण सुरुच राहिल आणि त्यासंबंधी पूर्ण माहिती गोळा केली जाईल. सीरमच्या लशीच्या प्रभावीपणाबाबत सांशकता असल्यास कोवॅक्सिनचा वापर करता येईल. भारत बायोटेकची लस बॅकअप म्हणून काम करेल, असं गुलेरिया म्हणाले आहेत. 

दरम्यान, भारत बायोटकच्या कोवॅक्सिन लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण न करता मंजुरी दिल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटलंय की, ''कोवॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण अजून पार पडलेले नाही. योग्य माहिती हाती येण्याआधीच लशीच्या वापराला परवानगी देणे धोकादायक ठरु शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. पूर्ण परीक्षण होईपर्यंत कोवॅक्सिनच्या वापराला परवानगी द्यायला नको होती. यादरम्यान भारताने अॅस्ट्राझेनकाच्या लशीसोबत अभियान सुरु करायला हवं होतं.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In an emergency situation Bharat Biotech vaccine will be used said AIIMS Director Dr Randeep Guleria