esakal | अपप्रचारपटांना प्रोत्साहन अन् निधीही; नसिरुद्दीन शाह
sakal

बोलून बातमी शोधा

Naseeruddin Shah

अपप्रचारपटांना प्रोत्साहन अन् निधीही; नसिरुद्दीन शाह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सरकारचे समर्थन करणारे, आपल्या लाडक्या नेत्यांचे गुणगान करणारे चित्रपट बनविण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन अन्् निधीही मिळतो. माझ्याकडे याचा कोणताही पुरावा नाही, पण ज्या पद्धतीने अपप्रचार करणारे असे भव्य चित्रपट बनविले जातात ते पाहिल्यानंतर संबंधित निर्माते अन्् अभिनेत्यांना ‘क्लीन चिट’ मिळत असल्याचे उघड होते, असे सनसनाटी वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.

एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, तीन खान का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, पण त्यांचा कसा छळ होईल याची कल्पना करू शकतो. त्यांना खूप काही गमवावे लागेल, जे केवळ आर्थिक नुकसानापुरते किंवा एखाद-दोन जाहिराती गमावण्यापुरते मर्यादित नसेल. संपूर्ण यंत्रणेलाच छळाला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच बडे अभिनेते प्रखर देशभक्तीचे सोंग करू शकत नाहीत.

हेही वाचा: लसींच्या मिश्रणावर चाचण्या सुरू; DCGIने दिली CMCला परवनगी

७१ वर्षीय नसिरुद्दीन हे तीन वेळचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्याचा जल्लोष करणारे काही भारतीय मुस्लीम हे सुद्धा कमी धोकादायक नाहीत, असे परखड मत त्यांनी अलीकडेच व्यक्त केले. त्यावरून त्यांना कौतुकाबरोबरच टीकेलाही सामोरे जावे लागले होते.

मुस्लीम असल्याने भेदभाव नाही, पण...

मुस्लीम असल्यामुळे चित्रपटसृष्टीत कधीही भेदभावाला सामोरे जावे लागले नाही, असेही नसिरुद्दीन यांनी स्पष्ट केले; मात्र मनाला योग्य वाटेल ते उघडपणे बोलल्यास छळ केला जातो, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, जो असे धाडस करतो त्याला भोगावे लागते. हा मुद्दा केवळ जावेद साहब (प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर) किंवा माझ्यापुरता मर्यादित नव्हे तर जो उजव्या विचारसरणीच्या विरोधात जाईल त्याला लागू आहे. दोन्ही पातळ्यांवर हे घडते आहे.

loading image
go to top