‘जेडीयू’तून कोणाची झाली हकालपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 30 January 2020

स्क्रीन शॉटमुळे वर्मा अडचणीत
पवन वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आघाडी करण्यास विरोध करीत ‘जेडीयू’चे अध्यक्ष असणाऱ्या नितीशकुमार यांना दोनपानी स्वतंत्र पत्र लिहिले होते. या पत्राचे स्क्रीन शॉट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. वर्मा यांच्या सोशल मीडियावरील भाष्याने नितीशकुमार विशेष नाराज झाले होते.

नवी दिल्ली - निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) आणि ज्येष्ठ नेते पवन के. वर्मा यांची आज संयुक्त जनता दलातून (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली. या दोघांवरही पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी थेट पंगा घेणे ‘पीकें’ना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही नेत्यांनी नागरिकत्व कायद्यावरून पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीके आणि नितीश यांच्यातील वाद शिगेला पोचला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून आपण पीकेंना पक्षात घेतले होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला होता. प्रशांत किशोर यांना पक्षामध्ये राहायचे असेल, तर त्यांना पक्षशिस्त  पाळावीच लागेल; अन्यथा त्यांनी पक्ष सोडावा, अशा शब्दांत नितीश यांनी त्यांना ठणकावले होते. यावर प्रशांत किशोर यांनीही नितीश यांच्यावर टीका करीत ते मला त्यांच्या रंगात रंगवू पाहत असल्याचे म्हटले होते.

मुंबई-पुण्याचं ट्रॅफिक पोहोचलं दुनियाभरात; बंगळूर 'नंबर 1'

राजकारणात फसलेला रणनीतिकार
पाटणा - बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीत २०१८ साली नितीशकुमारांच्या प्रचाररथाचे सारथ्य करीत त्यांना पुन्हा सत्ताधीश बनविणाऱ्या प्रशांत किशोर (पीके) यांच्यावर आज संयुक्त जनता दलातून (जेडीयू) बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

कधीकाळी ज्या नितीश यांनी ‘पीकें’च्या राजकीय कौशल्याचे कौतुक करीत त्यांना डोक्‍यावर घेतले, त्याच नितीश यांनी आज ‘पीकें’ना बाहेरचा रस्ता दाखविला. प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची चुणूक २०१४ मधील मोदी लाटेच्या वेळी पाहायला मिळाली होती. यानंतर पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी नितीश यांच्यासोबत मैत्री केली होती.

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

पुढे २०१५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचा प्रचार झंझावात उभा करण्याचे श्रेय ‘पीकें’नाच जाते. या निवडणुकीमध्ये भाजपला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

नितीश यांनी पुन्हा मुख्यमंत्री होताच प्रशांत किशोर यांना बक्षीस म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. प्रशांत किशोर यांच्या आगमनानंतर ‘जेडीयू’मधील अनेक जुने नेते अडगळीत पडले. त्यामध्ये आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांचाही समावेश होता. याचदरम्यान ‘जेडीयू’चे लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबतचे संबंध तुटले. पण, त्याचा कसलाही परिणाम नितीश आणि पीके यांच्या मैत्रीवर झाला नाही.

शरद पवारांनी काय आवाहन केले सर्व राजकीय पक्षांना

सिंहांची शहांशी मैत्री
प्रशांत किशोर यांनी २०१८ मध्ये अधिकृतरीत्या ‘जेडीयू’मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले होते. नितीश यांच्यानंतर पक्षात ‘पीकें’चे स्थान निर्माण झाले होते. प्रशांत किशोर हे भवितव्य असल्याचे जाहीर वक्तव्य नितीश यांनी केल्यानंतर ‘जेडीयू’मधील अनेक नेतेमंडळी अस्वस्थ झाली होती. पुढे तर ‘पीकें’नी पक्षातील नेत्यांच्या बैठकाही घ्यायला सुरुवात केली. नितीश यांच्यापाठोपाठ ‘पीकें’च्या घरीही नेतेमंडळी जमू झाली. याच काळात ‘जेडीयू’मध्ये बाजूला पडलेले आर. सी. पी. सिंह आणि लल्लन सिंह यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले. आर. सी. पी. सिंह यांनी दिल्ली भाजपमध्ये लॉबिंग करीत अमित शहांसोबत मैत्री प्रस्थापित केली.

...तरीही मिळाले स्थान
हे सगळे घडत असतानाच प्रशांत किशोर यांनी थेट पक्षाचे नेते नितीश यांच्यावरच निशाणा साधला. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेतल्यानंतर नितीश यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन करण्याऐवजी निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, असे विधान त्यांनी केले. हे विधान नितीश यांच्या जिव्हारी लागले. यानंतरही उभय नेत्यांमधील संबंध पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ‘पीकें’ना नितीश यांच्या शेजारी स्थान मिळाले होते.

...म्हणून पडली विकेट
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र नितीश यांनी पीकेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आर. सी. पी. सिंह यांना जवळ केले. लोकसभेसाठी जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी नितीश यांनी आर. सी. पी. सिंह यांच्या माध्यमातून अमित शहांसोबत बोलणी सुरू केली होती. यामुळे मुख्य प्रक्रियेतून पीके आपोआप बाजूला पडले. पुढे लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा नितीश यांनी सिंह यांच्याकडे सोपविली. नागरिकत्व कायद्यावरून ‘जेडीयू’ भाजपच्या पाठीशी उभा राहिला असताना ‘पीकें’नी मात्र त्याविरोधात विधाने केली. पुढे हा वाद वाढत गेला आणि त्यातून ‘पीकें’ची राजकीय विकेट पडली.

नितीशकुमार यांचे आभार! मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा. देव तुमचे भले करो.
- प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expulsion of PK Verma from JDI politics