कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.
Supreme Court
Supreme Courtsakal

नवी दिल्ली: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी पूर्ण कागदपत्रांसह दाखल केलेले अर्ज आल्यापासून ३० दिवसांच्या आत दाव्याचा निपटारा करणे बंधनकारक असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या व त्यापेक्षा यावर्षी एप्रिल-मे मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार उडविला होता. मृतांचा आज अखेरपर्यंतचा सरकारी आकडा ४ लाख ४५ हजार ७६८ आहे. यापैकी अनेक कुटुंबातील कर्ता पुरूष व अनेक कुटुंबात मातापिता कोरोनाने ओढून नेल्याने हजारो मुलांवर अनाथपण लादले गेले. या पीडीतांच्या परिवारांना मदत करणे , त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे याबाबत दिल्लीसह अनेक राज्य सरकारांनी निर्णय घेतले. मात्र पीडितांना रोख अर्थसाहाय्य करण्याबाबत केंद्राकडून आजपावेतो मौन बाळगण्यात आले होते. आता सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून प्रत्येकी ५० हजारांची रोख मदत करण्याचे जाहीर केले आहे. मदतीचे हे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर होणार आहे.

राज्य आपत्ती निवारण कोष (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) यांच्या माध्यमातून हे अर्थसाह्य दिले जाईल. ही मदत थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आर्थिक सहाय्यासाठी पीडित कुटुंबीयांना विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया वेगवान व तेवढीच पारदर्शकरीत्या पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्राधिकरणांची राहील. याबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पातळीवर समित्या नेमण्यात याव्यात अशीही सूचना केंद्राने केली आहे.

नव्या रुग्णांच्या आकड्यात घट

तिसरी लाट देशात येणार का, आली तर कधी येणार याच्या चर्चा जोरात असतानाच आज दिलासादायक वृत्त आले आहे. तब्बल १८६ दिवसांनंतर आज देशात कोरोनाची नवी रूग्णसंख्या ३० हजारांच्या खाली आली. शिक्षण क्षेत्र वगळता बहुतेक सारे व्यवहार पूर्ववत करणाऱ्या दिल्लीत सलग पाचव्या दिवशी एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. गेल्या २४ तासांत फक्त ३० नव्या रुग्णांची नोंद राजधानीत झाली. दिल्लीत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४११ पर्यंत घटली असून त्यातील ३१६ रूग्ण गृह विलीगीकरणात आहे.

Supreme Court
"नरेंद्र मोदींना तालिबानसारखा भारत बनवू देणार नाही"

रूग्ण बरे होण्याचा दर ९८.२२ टक्के आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात २६ हजार ९५४ नवे रूग्ण आढळले. यातील ६० टक्के रूग्ण केरळमधील आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या ३४, १६७ आहे. या काळात ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाखांच्या आसपास घटली आहे. कोरोनाला हरविणाऱ्यांची एकूण रूग्णसंख्या ३ कोटी २७ लाख ८३ हजार ७४१ आहे. कोरोना लसीकरणाने गती पकडली असतानाच नवीन रूग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com