तरुणी गाडीत बसली नाही तर गोळ्याच घातल्या; घटना CCTVमध्ये कैद

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

फरीदाबादमध्ये एका मुलीचे अपहरण आणि गोळी मारुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फरीदाबाद- राजधानी दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये एका मुलीचे अपहरण आणि गोळी मारुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. फरीदाबादच्या बल्लभगढ येथे सोमवारी एक तरुणी परीक्षा देऊन कॉलेजमधून परतत होती. यावेळी दोन तरुणांनी बंदुक दाखवून त्या तरुणचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने विरोध केल्यानंतर एका तरुणाने तिला गोळी घातली. गोळी डोक्यात लागल्याने तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी वल्लभगडच्या अग्रवाल कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेत होती. ती परीक्षा देऊन कॉलेजबाहेर पडली. त्यावेळी तौसीफ आणि रेहान नावाचे दोन आरोपींनी तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्यांनी कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. पण, मुलीने विरोध केल्याने तौसीफ नावाच्या तरुणाने तिला गोळी घातली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

भारत-अमेरिकेत 'BECA'सह पाच करार, चीनला गलवानवरुन दिला इशारा

पोलिसांनी आरोपी तौसीफला अटक केली आहे. 2018 मध्येही तौसीफने एका मुलीचे अपहरण केले असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, नंतर कुटुंबाने आपली केस वापस घेतली होती. सध्या क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे. 

दरम्यान, हे प्रकरण तापत असल्याचं दिसत आहे. संतापलेल्या निदर्शकांनी मंगळावारी दिल्ली-मथुरा नॅशनल हायवे रोखला होता. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: faridabad girl shot dead-outside college-in-ballabhgarh hariyana news