केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

 कृषी कायद्यावरून शेतकरी आणि सरकारमधील 11 वी बैठकसुद्धा निष्फळ ठरली. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यानं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांवर भडकले.

नवी दिल्ली - कृषी कायद्यावरून शेतकरी आणि सरकारमधील 11 वी बैठकसुद्धा निष्फळ ठरली. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यानं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांवर रागावले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं पावित्र्य नष्ट झालं आहे. काही लोक याचा राजकीय फायदा घेत आहेत. 

भडकलेल्या कृषीमंत्र्यांनी म्हटलं की, आम्ही सर्वात चांगला प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र काही लोकांकडून आंदोलन चालवलं जात असून त्यावर तोडगा निघू नये हेच पाहिलं जात आहे. अद्याप काही मार्ग निघालेला नाही कारण आंदोलक संघटनांमध्ये शेतकऱ्यांचं हित पाहणारे नाहीत. शेतकरी संघटना सातत्यानं कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. तर सरकारने अनेक पर्याय असलेले प्रस्ताव दिले आहेत. 

हे वाचा - हाथी मेरे साथी! हत्तीच्या मृत्युनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला; VIDEO VIRAL

बैठकीनंतर नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि राहील. विशेषत: पंजाबचे शेतकरी आणि इतर काही राज्यातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनावेळी सातत्यानं जनता आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. याचा फायदा घेऊन चांगल्या कामाच्या विरोधात असलेले काही लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. 

भारत सरकारचा प्रयत्न होता की ते योग्य विचार करतील. यासाठी 11 वी बैठक बोलावली होती. मात्र शेतकरी संघटना कायदा मागे घेण्याचा हट्ट करत आहेत. सरकारने एकापाठोपाठ एक प्रस्ताव दिले पण आंदोलनाचं पावित्र्य नष्ट होतं तेव्हा तोडगा निघत नाही. चर्चेच्यावेळी मर्यादांचे पालन झाले तर शेतकऱ्यांच्या हिताचं काही करता येईल. मात्र ही भावनाच नसल्यानं काहीच निर्णय होत नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री तोमर म्हणाले. 

हे वाचा - धक्कादायक! पाच महिन्यांपासून कोरोना पाठ सोडेना; 31 वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 11 चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरीही काहीच तोडगा निघलेला नाही. सरकारने शेतकरी संघटनांसोबत पुढच्या बैठकीसाठी कोणती तारीख दिलेली नाही. आता शेतकरी संघटनांनी आम्ही दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा असं सरकारने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm law farmers union and government 11 round talk no output say minister tomar