हाथी मेरे साथी! हत्तीच्या मृत्युनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला; VIDEO VIRAL

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. नजरेतून सुटू शकतं पण हृदयातून नाही. 

चेन्नई - जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे अनेक लोक आहेत. एखाद्या प्राण्याला आपण सांभाळतो आणि अचानक त्या प्राण्याचा मृत्यू झाला तर दु:ख होतं. सोशल मीडियावर सध्या अशाच प्राणीप्रेमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तामिळनाडुमधील एक फॉरेस्ट रेंजर हत्तीच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडल्याचा हा व्हिडिओ आहे. जखमी हत्तीला उपचारासाठी मृदुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये आणलं होतं. त्याची देखभाल संबंधित अधिकाऱ्याने केली होती. हत्तीला वाचवण्यासाठी वन  विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले मात्र जखमी हत्ती वाचू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना फॉरेस्ट रेंजर हत्तीच्या सोंडेला धरून कुरवाळताना दिसतो. 

भारतीय वन सेवेतील अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, तामिळनाडुतील मृदुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये सदावियाल एलिफंट कँपमध्ये त्यांच्या सहकाऱ्याने एका हत्तीला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. हे पाहणं खूपच भावनिक करणारं आहे.

हे वाचा - धक्कादायक! पाच महिन्यांपासून कोरोना पाठ सोडेना; 31 वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह

ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भावूक झाल्याचं म्हटलं आहे. एका युजरनं म्हटलं की, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केले. त्याला वाचवता आलं नाही. तुम्ही तुमच्या भावना शब्दात व्यक्त करू शकला नाहीत हे खूपच भावनिक होतं. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. नजरेतून सुटू शकतं पण हृदयातून नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamilnadu elephant tearful goodbye by forest ranger video viral