शेतकरी नेत्यांनी सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर विचारासाठी समिती नेमली

Farmer-Agitation-Delhi
Farmer-Agitation-Delhi
Updated on

नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर उद्या (ता. २३) उत्तर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी एक समितीही नेमली आहे. शेतकऱ्यांनी आज सकाळी दिल्ली-मेरठ महामार्ग रोखून धरल्याने दिल्लीकडे येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. दुपारनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर शेतकऱ्यांनी दिल्ली-गाझियाबाद हा पट्टा काही काळापुरता खुला केला. कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी आज संध्याकाळी काही शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्याचे ट्विट केले. 

सिंघू सीमेवर ४० शेतकरी संघटनांच्या नेत्यांची आज बैठक होऊन सरकारने पुन्हा दिलेल्या चर्चेच्या आमंत्रणावर विचार करण्यात आला. मात्र तिन्ही कायदे रद्द करा, ही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. आजच्या बैठकीत २५ ते २७ दरम्यान हरियानातील टोल प्लाझा मुक्त करणे, २७ तारखेला (रविवारी) पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी हे रेडिओ संबोधन चालू असताना देशभरात टाळ्या-थाळ्या बडविणे, २६ डिसेंबरला पुन्हा हुतात्मा दिन साजरा करणे आदी निर्णयांवरही शेतकरी नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकऱ्यांनी आज सकाळी साडे सातलाच दिल्ली-मेरठ महामार्ग अचानक रोखून धरला. परिणामी या रस्त्यांवरील वाहतूक पोलिसांनी आनंद विहार, भोपुरा व अप्सरा सीमा या मार्गाने वळविली. नोएडाला जाणाऱ्या वाहन चालकांना डीएनडी उड्डाण पूल, कालिंदी कुंज, न्यू अशोक नगर, कोंडली, व दल्लूपुरा आदी सीमांवरून वाहने वळविण्याची सूचना करण्यात आली आहे. याच रस्त्यांवरून एनसीआरमधील हजारो नागरिक कामानिमित्त रोज दिल्ली ते नोएडात ये-जा करत असतात. 

कृषी मंत्र्यांशी चर्चा
कृषीमंत्री तोमर यांनी कृषी भवनात आज काही शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. किसान संघर्ष समिती व भारतीय किसान युनियनचे नेते त्यात सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात काही दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार आहे का?, या मुद्यावर हे नेते चिंताग्रस्त होते. कायद्यांच्या सध्याच्या स्वरूपात काहीही दुरुस्त्या करू नयेत असे मत त्यांनी मांडल्याचेही तोमर यांनी म्हटले. मात्र हे कथित शेतकरी नेते आंदोलकांपैकी नसल्याचा खुलासा सिंघू सीमेवरील आंदोलकांनी केला.

शेतकऱ्यांची स्वतंत्र बैठक
सिंघू सीमेवर पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी वेगळी बैठक घेऊन सरकारच्या चर्चेच्या आमंत्रणावर उद्या (ता.२३) निर्णय घेण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली, असे शेतकरी नेते कुलवंतसिंग संधू यांनी सांगितले. शेतकरी-कामगार संघर्ष समितीने तोमर यांच्या सहीने केंद्राकडून आलेल्या या पत्रावरच आक्षेप घेतला आहे. समितीचे नेते श्रावणसिंग पंढेर यांनी सांगितले की "जर कायदे मागे घेण्याच्या मागणीपासून मागे हटून कायद्यांत दुरुस्त्या करण्यावर तुम्ही चर्चा करू इच्छित असाल तर तारीख व वेळ कळवा,’’ असे पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांना अडकविण्यासाठी सरकारने रचलेला हा चक्रव्यूह आहे असाही आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांचा ‘पोस्टर बॉय’
सत्तारूढ भाजपने कृषी कायद्यांची भलामण करण्यासाठी मुख्यतः पंजाब-हरियानात चालविलेल्या एका जाहिरातीवर ज्या शेतकऱ्याचा फोटो छापला आहे त्यांचे नाव हरप्रीत सिंग असे आहे. प्रत्यक्षात ते काळ्या कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील तीन आठवडे सिंघू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. ३५ वर्षांच्या हरप्रीत यांनी ही जाहिरात म्हणजे फसवणूक असल्याचे सांगून याबद्दल आपण भाजपला कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला. आपली परवानगी न घेता आपला फोटो भाजपने वापरून बेकायदा काम केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला व आपण भाजपचे नव्हे तर शेतकऱ्यांचे पोस्टर बॉय असल्याचा खुलासा करणारे भाषणही सिंघू सीमेवर केले. भाजपने बेकायदा आपले छायाचित्र जाहिरातीत वापरल्याचेही हरप्रीत म्हणाले. होशियारपूर येथे राहणारे हरप्रीत शेतकरी व पंजाबी दूरचित्रवाणी अभिनेतेही आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com