शेतकऱ्यांच्या बलिदानानंतरही मोदींच्या हृदयाला पाझर फुटेना; काँग्रेसची बोचरी टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

कृषी कायद्यावरून शेतकरी आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांमध्ये अनेक अडथळे आहेत. आता हे अडथळे हटवण्यात येत आहेत. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावरून आता मोदी सरकारवर काँग्रेसनं निशाणा साधला आहे. काँग्रेसनं असा दावा केला आहे की, कृषी कायद्याविरोधातील या आंदोलनादरम्यान 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इतक्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्ताचा दाखला देत ट्विट केलं आहे की, कृषी कायद्याला हटवण्यासाठी आमच्या किती भावंडांना आणखी किती आहुती द्यावी लागेल? 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही ट्विट केलं आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, गेल्या 17 दिवसांमध्ये 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंततरही मोदी सरकारला त्याबद्दल काहीच वाटत नाही. सरकार अजुनही अन्नदात्यांच्या नाही तर धन दांडग्यांच्या बाजूने उभा आहे का? राजधर्म मोठा आहे की यांचा हट्ट? असाही प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे.

अहमद खानने दिले कोरिओग्राफर रेमो डिसूजाचे हेल्थ अपडेट्स

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननने पाण्याचा फवाराही करण्यात आला होता. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आंदोलनावेळी आजारी पडल्यानंतर 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीचा दाखला देत काँग्रेसनं मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

दरम्यान, एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला पुन्हा एकदा इशारा देताना हे आंदोलन त्यांच्या जीवनाचा लढा आहे असं म्हटलं. सरकार जर कायद्यात 14 सुधारणा करण्यास तयार आहे तर मग कृषी कायदा मागेच का नाही घेत असाही प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

PowerAT80 : हार के जीतनेवाला बाजीगर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी FICCI च्या सर्वसामान्य वार्षिक बैठकीत कृषी कायद्यावर त्यांचे म्हणणे मांडले आहे. कृषी कायद्यावरून शेतकरी आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांमध्ये अनेक अडथळे आहेत. आता हे अडथळे हटवण्यात येत आहेत. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल. यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल असंही मोदींनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers protest congress ask question to modi government tweet rahul gandhi randeep surjewala