Farmers Protest : केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र PM मोदींनी केलं ट्विट; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

 'प्रिय शेतकरी बंधु आणि भगिनींनो' अशी सुरवात असणाऱ्या या पत्रात कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातलीय

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात तीन आठवड्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चेच्या पाच बैठका होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना काल गुरुवारी एक 8 पानी पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना कृषी कायदे त्यांच्यासाठी कसे फायद्याचे आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या हे पत्र वाचण्याचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

हेही वाचा - 'प्रिय, शेतकरी बंधू आणि भगिनींनो...' केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लिहलं 8 पानी पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमरजी यांनी शेतकरी बंधु-भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. एक विनम्र संवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरुर वाचावं. देशवासीयांना देखील माझा आग्रह आहे की त्यांनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवावं.

या आंदोलनाला आता वेगळं वळण लागत असून बुधवारी संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर आंदोलनाची धग वाढली आहे. केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलन तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती. भाजप मुख्यालयात सुरु असलेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, अर्थमंत्री निर्मला सितारमण हे उपस्थित होते. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना एक 8 पानी पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना कृषी कायदे त्यांच्यासाठी कसे फायद्याचे आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

काय म्हटलंय पत्रात?
 'प्रिय शेतकरी बंधु आणि भगिनींनो' अशी सुरवात असणाऱ्या या पत्रात कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातलीय. त्यांनी आपणही शेतकरी कुटुंबातूनच वाढल्याचा हवाला देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, देशातील वेगवेगळ्या बागातून असा शेतकऱ्यांची उदाहऱणे समोर य़ेत आहेत ज्यांना नव्या कृषी कायद्याचा फायदा होत आहे. मीसुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे. शेतीतल्या लहान लहान गोष्टी आणि त्यातली आव्हाने दोन्ही पाहत, समजतच लहानाचा मोठा झालो आहे. शेताला पाणी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, पाणी सुरु असताना अनेकदा अडचणी येतात, अवेळी पावसाचा मारा, वेळेवर पडलेल्या पावसामुळे होणारा आनंद या सर्व गोष्टी माझ्याही आयुष्याचा भाग होत्या. पीक कापल्यानंतर त्याची विक्री होण्यासाठी मीसुद्धा वाट पाहिली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Protest pm narendra modi appeal to farmers to read agriculture minister narendra tomar letter