esakal | आम्ही कोणाच्या हातातील बाहुले नाहीत; पाकिस्तानच्या कौतुकानंतर फारुख अब्दुलांनी फटकारले 
sakal

बोलून बातमी शोधा

faruk_abdulla.jpg

जम्मू-काश्‍मीरमधील सहा राजकीय पक्षांनी २२ ऑगस्टला श्रीनगर येथे फारुख अब्दुल्ला यांच्या गुपकार रस्त्यावरील निवासस्थानी एकत्र येत कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केला.

आम्ही कोणाच्या हातातील बाहुले नाहीत; पाकिस्तानच्या कौतुकानंतर फारुख अब्दुलांनी फटकारले 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जम्मू-काश्‍मीरमधील राजकीय पक्षांनी केलेल्या गुपकार ठरावाचे पाकिस्तानने कौतुक केल्यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. आम्ही कोणाच्याही हातातील बाहुले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील सहा राजकीय पक्षांनी २२ ऑगस्टला श्रीनगर येथे फारुख अब्दुल्ला यांच्या गुपकार रस्त्यावरील निवासस्थानी एकत्र येत कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केला. या ठरावाचे पाकिस्तानने नुकतेच कौतुक केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, पाकिस्तानने कायमच जम्मू-काश्‍मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांचा अवमान केला आहे. आता त्यांना अचानक आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे. मात्र, आम्ही कोणाच्याही हातातील बाहुले नाहीत, दिल्लीच्याही नाही आणि सीमेपलीकडील सरकारच्याही हातातील नाही, हे स्पष्ट करतो. 

प्रणव मुखर्जी अद्याप कोमातच; लष्करी रुग्णालयाने प्रकृतीबाबत दिली माहिती

आम्ही फक्त जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला उत्तरदायी असून फक्त त्यांच्यासाठीच काम करतो. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, काँग्रेस आणि इतर तीन पक्षांनी मिळून मंजूर केलेला गुपकार ठराव ही महत्त्वाची घडामोड असल्याची टिपण्णी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केली होती. 

आम्हाला रक्तपात नको आहे 


पाकिस्तानने काश्‍मीरमध्ये सशस्त्र लोकांना पाठवणे बंद करावे, असे आवाहन फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान सरकारला केले. ‘आम्हाला पाकिस्तानमधील रक्तपात थांबवायचा असून येथील सर्व राजकीय पक्षांना शांततेनेच सर्व प्रश्‍न सोडविण्याची इच्छा आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला आमच्याकडून जे हिसकावून घेतले गेले, तेही आम्ही शांततेच्याच मार्गाने मिळवू,’ असे अब्दुल्ला म्हणाले. भारत आणि पाकिस्तानने चर्चा सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.