
मुलांनाच म्हातारपणाची काठी समजण्याची मानसिकता भारतीय समाजाची आहे. मात्र, पोटचा मुलगाच जर वाईट निघाला तर?
मध्य प्रदेश : भारतीय समाजात आपल्या मुलासाठी पालक काहीही करतात. मुलगाच व्हावा, ही बहुतांश पालकांची इच्छा असते. मुलाचाच जन्म व्हावा, यासाठी काहीही करण्यास पालक तयार असतात. मुलगा हाच वंशाचा दिवा मानण्याची भारतीयांची मानसिकता आहे. मुलाच्या जन्मानंतर मुलीच्या तुलनेत अधिक आनंद व्यक्त केला जातो. कारण मुलांनाच म्हातारपणाची काठी समजण्याची मानसिकता भारतीय समाजाची आहे. मात्र, पोटचा मुलगाच जर वाईट निघाला तर? तर मात्र पालकांची निराशा होते. मध्येप्रदेशातील छिंदवाडामध्ये एका शेतकऱ्यांसोबत अशीच घटना घडली आहे. चौरई ब्लॉक केक बाडीचे रहिवासी असणारे शेतकरी ओम नारायण वर्मा हे आपल्या मुलाच्या एकूण वर्तनावर नाराज होते. त्यांची ही नाराजी हळूहळू इतकी वाढत गेली की, त्यांनी आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा आपल्या प्रामाणिक अशा कुत्र्याच्या नावे करुन टाकला आहे.
हेही वाचा - आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा यू-टर्न; संपू्र्ण देशाला मोफत लशीची घोषणा मागे
आपल्या मुलाच्या वर्तनावर ते खुपच नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपलं मृत्यूपूर्वीचं इच्छापत्र तयार केलं. त्यांच्याजवळ एकूण 18 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा आपली दुसरी पत्नी असलेल्या चंपाच्या नावावर केला आणि उर्वरित अर्धी जमीन आपल्या पाळीव कुत्र्याच्या नावावर करुन टाकली आहे. शेतकऱ्याच्या या कुत्र्याचे नाव जॅकी असं आहे. या शेतकऱ्याने अगदी कायदेशीर रित्या शपथ पत्र तयार करुन आपल्या कुत्र्याला आपला वारस घोषित करत त्याच्या नावे संपत्ती करुन टाकली आहे.
या शेतकऱ्याने आपल्या वारसापत्रात लिहलंय की, माझी सेवा माझी पत्नी आणि माझा पाळीव कुत्रा करतो. ते मला सर्वाधिक प्रिय आहेत. माझ्या मरणानंतर माझी सगळी संपत्ती आणि जमीन-जुमला माझी पत्नी चंपा वर्मा आणि पाळीव कुत्रा जॅकी यांच्या नावावर असेल. यासोबतच त्यांनी लिहलंय की, कुत्र्याची सेवा करणाऱ्याला संपत्तीचा पुढचा वारस मानले जाईल. अवघ्या 11 महिन्यांचा असलेला हा जॅकी नावाचा कुत्रा नेहमीच या शेतकऱ्यासोबत राहतो. शेतकरी ओम नारायण वर्मा यांच्या दोन पत्नी आहेत. पहिली पत्नी धनवंती वर्मा आहे जिला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. तर दुसरी पत्नी चंपा वर्मा आहे जिला दोन मुली आहेत.